R. Ashwin : ‘फलंदाजी सोडून उगाच गोलंदाज झालो’ : आर. अश्विन | पुढारी

R. Ashwin : ‘फलंदाजी सोडून उगाच गोलंदाज झालो’ : आर. अश्विन

चेन्नई; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतीय संघाला 209 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो आर. अश्विनसारख्या कसोटीतील अव्वल गोलंदाजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळणे. अश्विनला बेंचवर बसवल्याने अनेक दिग्गजांनी टीकेची झोड उठवली, पण आता स्वत: अश्विनने या प्रकरणावरील मौन सोडत आपली प्रतिक्रिया देत निराशा व्यक्त केली आहे, आपण उगाच गोलंदाज झालो असे आपल्याला वाटत आहे, असे त्याने म्हटले आहे. (R Ashwin)

आर. अश्विनने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मला डब्ल्यूटीसीची फायनल खेळायची होती. कारण, संघाला इथेपर्यंत आणण्यात माझाही हातभार होता. गेल्या फायनलमध्येही मी चार विकेटस् घेतल्या होत्या. 2018-19 सालापासून परदेशातही माझी कामगिरी चांगली राहिली आहे. मी खेळू शकलो नाही आणि आपण विजेतेपदही पटकावू शकलो नाही. खरेतर मला 48 तासांपूर्वी माहीत पडले होते की, मला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, पण माझे लक्ष्य हेच होते की, मला संघाच्या विजयात शक्य होईल ते योगदान द्यायचे होते.’ (R. Ashwin)

खेळपट्टीचे कारण देत अश्विनला डब्ल्यूटीच्या फायनलमधून बाहेर बसवण्यात आले, पण भारताच्या फलंदाजी क्रमात कुठलाच मोठा निर्णय घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर अश्विनने नाराजी व्यक्त केली. कारकिर्दीच्या सुरुवातीला अश्विन एक फलंदाज होता, पण भविष्याची गरज ओळखून त्याने गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. अश्विनचा हाच निर्णय आता त्याला चुकीचा वाटत आहे. याबाबत खंत व्यक्त करत तो म्हणाला, ‘उद्या जेव्हा मी निवृत्ती घेईन तेव्हा मला पश्चाताप होईल की चांगला फलंदाज असूनही मी गोलंदाज बनायला नको होते. मी नेहमीच या गोष्टीशी संघर्ष करत आलो आहे, फलंदाज आणि गोलंदाज यांना वेगळी वागणूक दिली जाते. दोन्हीसाठीची मोजपट्टी नेहमीच पूर्णपणे भिन्न राहिली आहे.’ (R Ashwin)a

अश्विनची कामगिरी

अश्विनने आतापर्यंत परदेशी भूमीवर 36 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 32 च्या सरासरीने 133 विकेटस् घेतल्या आहेत. तर एकूण 92 कसोटी सामन्यांत त्याने 23.93 च्या सरासरीने 474 बळी घेतले आहेत आणि अनिल कुंबळेनंतर तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. यावर्षी अश्विन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील 4 कसोटीत 17.28 च्या सरासरीने 25 बळी मिळवले आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला. कांगारूंविरुद्धच्या 22 सामन्यांत त्याने 28.36 च्या सरासरीने 114 विकेटस् घेतल्या आहेत. इंग्लंडमधील त्याची कामगिरीही समाधानकारक अशीच आहे. इंग्लिश मैदानांवर त्याने 7 सामन्यांत 28.11 च्या सरासरीने 18 विकेटस् घेतल्या आहेत. त्याने 32 डावांत 5 बळी आणि 7 सामन्यांत 10 बळी घेतले आहेत. कसोटीत मुरलीधरननंतर सर्वात कमी सामन्यांमध्ये 400 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.

‘मी आता कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे की काही गोष्टींचे वाईट मला वाटत नाही. आपल्याबरोबर जे काही घडले ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार मी आता करत बसत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एवढा अनुभव असल्यावर काही गोष्टी तुमच्यामध्ये भिनत असतात. त्या गोष्टी आता माझ्यामध्ये आल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींचे वाईट वाटत नाही आणि त्याचा कोणताही परिणाम माझ्यावर होत नाहीत.’

– आर. अश्विन

हेही वाचा;

Back to top button