Lionel Messi : मेस्सीचा फुटबॉलला राम राम…२०२६ चा वर्ल्डकप न खेळण्यावर ठाम! | पुढारी

Lionel Messi : मेस्सीचा फुटबॉलला राम राम...२०२६ चा वर्ल्डकप न खेळण्यावर ठाम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने मंगळवारी (१३ जून) आगामी वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे. २०२२ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये मेस्सीने आपल्या नेतृत्वाखाली संघाला चॅम्पियन बनवले होते. २०२६ साली होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा आपला इरादा नसल्याचे त्याने सांगितले आहे. २०२२ ची स्पर्धा त्याची शेवटची होती. असे त्याने सांगितले आहे. कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये मेस्सीला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गोल्डन बॉल देऊन सन्मानित करण्यात आले होते. (Lionel Messi)

मेस्सीने गेल्या वर्षी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत फायनल फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव करत वर्ल्डकप आपल्या नावावर केला होता. तर २०२२ सालच्या वर्ल्डकपमध्ये फ्रान्सला पराभूत करून अर्जेंटिनाने जेतेपदावर कब्जा केला. (Lionel Messi)

अर्जेंटिनाचा संघ चीन आणि इंडोनेशियाच्या दौऱ्यावर

मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी मेस्सी अर्जेंटिना संघासोबत चीनला गेला आहे. तेथे त्याच्या संघाला १५ जूनला बीजिंगच्या वर्कर्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. यानंतर अर्जेंटिना इंडोनेशियाला जाणार आहे. तेथे जकार्ता येथे १९ जून रोजी यजमान देशाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. मेस्सीने चीनमधीलच एका वृत्तपत्राशी संवाद साधत विश्वचषकाबाबत सांगितले.

काय म्हणाला मेस्सी?

चिनी वृत्तपत्र टायटन स्पोर्ट्सने २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार का असे विचारले असता मेस्सी म्हणाला, “मला तसे वाटत नाही.” हा माझा शेवटचा विश्वचषक(२०२२) होता. गोष्टी कशा होतात ते मी बघेन, मी पुढच्या वर्ल्डकप खेळणार नाही. (Lionel Messi)

Argentina national football team

२०२६ मध्ये होणारा वर्ल्डकप तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मेस्सी सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणार आहे. २०२४ साली होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेनंतर तो निवृत्त होऊ शकतो.

अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकाने मेस्सीच्या खेळण्याबाबत केली होती आशा व्यक्त

अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेस्सीबद्दल म्हणाले होते, “त्याच्यासाठी संघाचे दरवाजे खुले आहेत.” तो खेळला नाही तर आम्ही पर्याय शोधू. मला आशा आहे की मेस्सी पुढच्या विश्वचषकात खेळेल. मी त्याला तिथे पाहू शकतो.

ही वर्षे मेस्सीसाठी खास

मेस्सीने अर्जेंटिनासाठी १७४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०२ गोल केले आहेत. २०२१ आणि २०२२ हे वर्ष मेस्सीसाठी खास ठरले. या दोन वर्षांत त्याने देशासाठी तीन ट्रॉफी जिंकल्या. २०२१ मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेवर कब्जा केला. त्यानंतर अर्जेंटिनाने फायनालिसिमा जिंकला आणि २०२२ चा वर्लकप जिंकत इतिहास रचला.

हेही वाचा;

Back to top button