SAFF Cup Ind vs Pak : आशिया चषकाआधी भारत-पाकिस्तान भिडणार बेंगळुरूमध्ये | पुढारी

SAFF Cup Ind vs Pak : आशिया चषकाआधी भारत-पाकिस्तान भिडणार बेंगळुरूमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : SAFF Cup India vs Pakistan Football Match : क्रीडा जगतात, चाहते नेहमीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आता चाहत्यांना दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (सॅफ कप) या फुटबॉल स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही देशांचे फुटबॉल संघ तब्बल ५ वर्षांनंतर एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. (SAFF Cup Ind vs Pak)

२१ जून ते ४ जुलै दरम्यान बेंगळुरू येथे होणाऱ्या SAFF कपसाठी दोन्ही शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. SAFF कपच्या ड्रॉमध्ये गतविजेत्या भारत, पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळला या संघाना अ गटात, तर लेबनॉन, मालदीव, बांगलादेश आणि भूतान यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. (SAFF Cup Ind vs Pak)

स्पर्धेमधील ग टाचे सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जाणार आहेत. आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. आठ देशांची ही स्पर्धा बेंगळुरूच्या कांतीर्व स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

ही स्पर्धा अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी दक्षिण आशियाबाहेरील लेबनॉन आणि कुवेत या दोन देशांना स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लेबनॉन हा ९९ व्या क्रमांकासह स्पर्धेत सहभागी होणारा सर्वोत्कृष्ट रँकिंग असणारा संघ आहे. तर भारतीय संघ जागतिक क्रमवारीत १०१ व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत पाकिस्तान अवस्था फार बिकट आहे. पाकिस्तानचा संघ जागतिक क्रमवारीत १९५ व्या स्थानावर आहे.

पहिल्याच दिवशी हायव्होटेज सामना

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी (दि.२१) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील सामना खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुवेत आणि नेपाळ यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना सप्टेंबर २०१८ मध्ये ढाका येथे झालेल्या SAFF कपच्या १२व्या आवृत्तीदरम्यान झाली होती. भारताने हा सामना ३-१ अशा गोल फरकाने जिंकला होता. पण, स्पर्धेच्या अंतिम फेरीत मालदीवविरुद्ध २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

भारत आणि पाकिस्तान यांनी अधिकृतपणे एकूण २० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने वर्चस्व राखताना १२हून अधिक सामने जिंकले आहेत. भारताने आठ वेळा सॅफ कपचे विजेतेपद पटकावले आहे, तर चार वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. २००३ मध्ये ढाका येथे झालेल्या पाचव्या हंगामात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेत भारतीय संघाला तिसरा क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

पाकिस्तानला व्हिसा मिळण्याची आशा

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ला आशा आहे की पाकिस्तानी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिसा मिळेल. एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे म्हणाले, “पाकिस्तानने स्पर्धेतील त्यांचा सहभाग निश्चित केला आहे, त्यामुळे त्यांचे नाव ड्रॉमध्ये आहे.” दक्षिण आशिया क्षेत्रातील सर्व देशांना या स्पर्धेत खेळण्याचा अधिकार आहे. पुढे ते म्हणाले, ‘पण व्हिसा देणे, संघाला सुरक्षा देणे, ही कोणत्याही देशाच्या फुटबॉल महासंघाची कामे नाहीत. AIFF प्रशासन सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधेल आणि आम्हाला योग्य वेळी प्रतिसाद मिळेल.

एआयएफएफचे सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी पीटीआयला सांगितले की, पाकिस्तानच्या संघाने आधीच भारतात येण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला आहे आणि अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाकरन पुढे म्हणाले, “आम्हाला पाकिस्तानच्या व्हिसाबाबत कोणतीही समस्या दिसत नाही.

१९९३ पासून झालेल्या १३ पैकी दोन स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भाग घेतलेला नाही. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन (PFF) अंतर्गत समस्यांमुळे भारतात आयोजित २०१५ साली झालेल्या स्पर्धेत संघ पाठवू शकला नाही. तर FIFAच्या निलंबनामुळे संघ मालदीवमध्ये २०२१च्या स्पर्धेत खेळू शकला नव्हता. फिफाने गेल्या वर्षी जूनमध्ये पाकिस्तानवरील निलंबन मागे घेतले आहे.

हेही वाचा;

Back to top button