

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेने मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार आठवडे देशभरात मान्सून गती मंदावेल. त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) मान्सूनवर परिणाम झाला असून जूनमध्ये कमी पाऊस पडेल.
कमकुवत मान्सूनचे कारण चक्रीवादळ बिपरजॉय (Biparjoy Cyclone) आहे, ज्यामुळे पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो, पण यावेळी तो सामान्य वेळेपेक्षा एक आठवडा उशिरा दाखल झाला आहे. एक्स्टेंडेड रेंज प्रेडिक्शन सिस्टम (ERPS) ने पुढील चार आठवडे म्हणजे 6 जुलैपर्यंत कमकुवत मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये साधारणपणे १५ जूनपर्यंत पाऊस पडतो, परंतु तरीही या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप कायम आहे.
स्कायमेट हवामानानुसार, अरबी समुद्रावरील चक्रीवादळ बिपरजॉय तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील एकाकी भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, चक्रीवादळामुळे रविवारी गुजरात किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा