

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : पुणे मुंबई महामार्गावर आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे रसायन घेऊन येणारा टॅंकर दुभाजकाला धडकल्याने उलटला. काही क्षणात टँकरला आग लागल्याने जळून खाक झाला. यामुळे मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या दोन्ही मार्गिका वाहतूकीसाठी महामार्ग पोलिसांनी बंद ठेवल्या आहेत. या अपघातात चालक, क्लीनर जखमी अथवा गंभीर दुखापत झाल्याचे माहिती अद्याप महामार्ग पोलीसांकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
आज (दि. १३) सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने रसायन घेऊन मुंबई दिशेने येणारा टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने टॅंकर दुभाजकाला जाऊन धडकला. काही कळण्याच्या आता टँकरने पेट घेतला. यावेळी या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना कळताच खोपोली, खंडाळा महामार्ग केंद्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने एक्सप्रेस वेच्या दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली. दुपार पासून टँकर महामार्गावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी महामार्गाचे पोलीस अधिक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि यंत्रणा वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रयत्न करत आहे.