Gujarat HC : १७ वर्षे पुर्ण होण्याआधीच मुलांना जन्म देणे सामान्य होतं; मनुस्मृती वाचा – गुजरात हाय कोर्ट | पुढारी

Gujarat HC : १७ वर्षे पुर्ण होण्याआधीच मुलांना जन्म देणे सामान्य होतं; मनुस्मृती वाचा - गुजरात हाय कोर्ट

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : गुजरात उच्च न्यायालयाच्या (Gujarat HC) एका टिप्पणीची सध्या खूप चर्चा होत आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर जे. डेव्ह यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना नमूद केले की पूर्वीच्या काळी १४-१५ वयोगटातील मुलींनी १७ वर्षांच्या होण्यापूर्वी लग्न करणे आणि मुलाला जन्म देणे हे सामान्य होते. त्यासाठी त्यांनी मनुस्मृतीचा हवाला दिला.

लाइव्हलॉच्या वृत्तानुसार, गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या ७ महिन्यांपेक्षा जास्त वयाचा गर्भ संपुष्टात आणण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. पीडितेचे वय १६ वर्षे ११ महिने असल्याचे सांगण्यात आले आहे. सुनावणी दरम्यान, बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या वकिलांनी मुलीचे लहान वय लक्षात घेता गर्भपाताचा आग्रह धरला. (Gujarat HC)

त्यावर न्यायमूर्ती समीर जे. डेव्ह यांच्या खंडपीठाने सांगितले की, “आपण २१ व्या शतकात जगत असल्यामुळे, तुमच्या आईला किंवा आजीला विचारा लग्नासाठीचे १४-१५ वर्षे हे जास्तीत जास्त वय होते. मूल १७ वर्षांच्या आधी जन्माला यायचे. मुली मुलांपेक्षा आधी वयात येतात त्यामुळे ४ – ५ महिने इकडे तिकडे काही फरक पडत नाही. तुम्ही हे वाचणार नाही, पण यासाठी एकदा मनुस्मृती वाचा.”

वृत्तानुसार, गर्भ ७ महिन्यांपेक्षा जास्त जुना असल्याने या प्रकरणात गर्भधारणा संपुष्टात आणली जाऊ शकते का ? याबाबत त्यांनी आपल्या चेंबरमध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत केली असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने राजकोटच्या सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षकांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या वडिलांना सांगितले आहे की, डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाच्या आधारे गर्भपाताला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवण्यात आली आहे.


अधिक वाचा :

Back to top button