IND vs AUS WTC Final : अश्‍विन की शार्दुल, कोणाला मिळणार संधी?

IND vs AUS WTC Final : अश्‍विन की शार्दुल, कोणाला मिळणार संधी?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 'कसोटी चॅम्पियन' कोण? यासाठी आजपासून अंतिम लढाई रंगणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर होणारी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून भारत आपला आयसीसी ट्रॉफीचा दशकाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संधी देऊ शकतो. त्याचबरोबर स्कॉट बोलँडला ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते.

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करून दहा वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

रोहितसमोर असणार संघ निवडीचे आव्‍हान

भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर संघ निवडीचे आव्‍हान असणार आहे. भारतीय संघात फलंदाज निवड स्‍पष्‍ट आहे. मात्र गोलंदाज निवडीवरुन कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांची कसोटी असणार आहे. कसोटी अंतिम सामन्‍यात अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाच खेळाडूला संधी मिळणार आहे. त्याचवेळी उमेश यादव आणि जयदेव उनाडकटमधील एका खेळाडूला बाहेर बसावे लागणार आहे.

IND vs AUS WTC Final : कसा असेल भारतीय संघ ?

शुभमन गिल आणि रोहित शर्मा टीम इंडियाचे सलामीवीर असतील. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराचे आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान निश्चित झाले आहे. अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर खेळेल असे मानले जात आहे. रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकावर संधी मिळेल. अशा परिस्थितीत केएस भरत किंवा इशान किशनला सातव्या क्रमांकावर संधी दिली जाईल. अंतिम सामन्‍यात इशान किशनऐवजी भरतला संधी मिळण्‍याची शक्‍यता अधिक आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची जागा निश्चित आहे, मात्र तिसर्‍या वेगवान गोलंदाजासाठी उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यात लढत आहे. त्याचबरोबर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी पाचवा गोलंदाज म्हणून निवड करणे कठीण होणार आहे. आता अश्‍विन की शार्दुल या दौघांपैकी कोणाला संधी मिळणार याचे उत्तर कर्णधार रोहित शर्मा हे सामन्‍यापूर्वी देणार आहे.

ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे त्रस्त

कसोटी अजिंक्‍यपदाच्‍या अंतिम सामन्‍यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतीने हैराण झाला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड या सामन्‍याला मुकणार आहे. त्‍याच्‍या ऐवजी स्कॉट बोलँडला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. वॉर्नर-ख्वाजा हे ऑस्‍ट्रेलियाचे सलामीवीर असतील. लबुशेन, स्मिथ, हेड आणि ग्रीन यांची मधल्या फळीत जागा निश्चित आहे. यष्‍टीरक्षणाची जबाबदारी अॅलेक्स कॅरीवर असेल. मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड हे वेगवान गोलंदाज म्हणून कर्णधार कमिन्ससोबत खेळतील. त्याचबरोबर नॅथन लायन हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल असे मानले जात आहे.

ऑस्ट्रेलिया संभाव्‍य संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन.

भारत संभाव्‍य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूर, उमेश यादव किंवा जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news