MS Dhoni : नेतृत्वगुणांचे विद्यापीठ - महेंद्रसिंग धोनी | पुढारी

MS Dhoni : नेतृत्वगुणांचे विद्यापीठ - महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीला जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात बघता तेव्हा जगातल्या सर्व उत्तम मॅनेजमेंट संस्था आणि त्यात शिकवला जाणारा अभ्यासक्रम यांची माफी मागून सांगावेसे वाटते की नेतृत्वगुण हा विषय वर्गाच्या चार भिंतीत बसून शिकण्याचा नाही. लीडरशिप स्किल्स किंवा कॉर्पोरेट बिझनेस स्ट्रॅटिजीसारखे अवजड विषय धोनी अगदी सोप्या पद्धतीने मैदानात शिकवतो. कारण मॅनेजमेंट बाय कॉमन सेन्स या सोप्या तत्त्वावर त्याचे मैदानातले कामकाज चालते. दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक, अनेक मालिका जिंकून देणार्‍या भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने जेव्हा सोमवारी वयाच्या 41 व्या वर्षी पाचव्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा धोनीने जणू काही कर्णधारपदाच्या आदर्श गुणांचा एक नवा परिपाठच पुन्हा घालून दिला. (MS Dhoni)

धोनीचे नेतृत्व हे मुळात ज्या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे त्या म्हणजे भविष्याचा विचार करून आताचा क्षण जगणे, आपल्या सहकार्‍यांना जबाबदारीची ओळख करून दिल्यावर त्यांच्या कामात लुडबूड न करता त्यांना स्वतंत्र विचाराने वाटचाल करू द्यायला मोकळीक देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकार्‍यांबाबत कुठचाही निर्णय घेताना स्वतःला त्या परिस्थितीत कल्पून पाहणे आणि मगच निर्णय घेणे. आपण जेव्हा सामन्याचा निकाल लागल्यावर मानतो तो धोनीला आधीच कळलेला असतो. 2011 च्या विश्वचषकात धोनीच्या त्या प्रसिद्ध षटकाराने आपल्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले, पण धोनीच्या मते त्याने विजय कमीत कमी वीस मिनिटे आधीच बघितला होता. युवराज बरोबरची भागीदारी जमल्याने त्याच्या द़ृष्टीने तो षटकार हे फक्त औपचारिक शिक्कामोर्तब होते. याच कारणांनी धोनी सामन्याच्या निकालानंतर स्थितप्रज्ञ असतो. ते क्षण तो जगतो आणि एखाद्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यासारखा तो पुढचा विचार करायला सुरुवात करतो. म्हणूनच जेव्हा 2011 च्या विश्वचषक विजयानंतर समस्त भारत वर्ष रात्रभर जल्लोष करत होता तेव्हा धोनी रात्री साडेबारा वाजता त्याच्या हॉटेल रूमवर होता. त्याच्यासाठी हा विजय क्षण वीस मिनिटे आधी चालू झाला होता आणि खूप लवकर संपला. (MS Dhoni)

रविवारच्या पावसानंतर सोमवारी पावसाची शक्यता असली तरी मागमूस नव्हता. धोनीने नाणेफेक जिंकून जेव्हा गोलंदाजी स्वीकारली तेव्हा बहुतेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण अंतिम सामन्यात पाऊस नसला तर पाठलाग करायचे दडपण का घ्या? पण धोनीच्या स्क्रिप्टप्रमाणे पाऊस चेन्नईच्या पहिल्याच षटकात आला आणि सर्व समीकरणे बदलली. गुजरातचा संघ हा जास्त समतोल होता. धोनीच्या कल्पक क्षेत्ररचनेने शुभमन गिलला सापळा व्यवस्थित लावला होता. दीपक चहरने तो झेल सोडला नसता तर दोनशे गाठणे कठीण होते. गुजरात आणि चेन्नईच्या (MS Dhoni)

प्रत्येक क्रमांकाच्या खेळाडूची तुलना केली तर गुजरात केव्हाही अव्वल होता, पण धोनीने चेन्नईचा संघ बांधला आहे तो एका कुटुंबासारखा. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हिड कॉन्वे हे आज इतके एकमेकांना ओळखतात की ते जगातल्या कुठल्याही संघातून उत्तम सलामी देतील. अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेटचा ‘अनसंग हिरो’ होता. (MS Dhoni)

त्याच्यावर हा टी-20 चा खेळाडू नाही शिक्का मारून आपण मोकळे झालो. जेव्हा मोईन अलीच्या ऐवजी त्याला सुरुवातीला संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचे सोने केले, पण श्रेय धोनीला जाते. कारण धोनीने त्याला फक्त त्याच्या भूमिकेची कल्पना दिली. ती कशी निभवायची ते रहाणेवर सोडले. ‘मॅनेजमेंट बाय डेलिगेशन’ म्हणतात ते याहून काय वेगळे? हार्दिक पंड्या हा धोनीचा चाहता, शिष्य सर्वकाही आहे तेव्हा हा अंतिम सामना गुरू-शिष्यात झाला. पंड्याचे नेतृत्वगुण खूप सुधारत आहेत, पण अजून त्याला गुरूची उंची गाठायला अवकाश आहे. धोनी त्याच्या गोलंदाजांना एक दिशा सांगतो आणि जरी पथिराना सारखा गोलंदाज त्यात वाईड टाकत होता तरी धोनीने त्याच्या गोलंदाजीत लुडबूड केली नाही. तुषार देशपांडेचा इकॉनॉमी रेट स्पर्धेच्या सुरुवातीला खूप जास्त होता, पण त्याला नेमून दिलेल्या कामगिरीवर धोनीने विश्वास ठेवून त्याला आत्मविश्वास दिला. याउलट पंड्याचे गोलंदाजांचे धोरण वेगळे होते. मिडऑन किंवा मिडऑफवरून तो गोलंदाजाशी वारंवार चर्चा करायचा. मोहित शर्मा हा नेट गोलंदाज होता तर त्याला अखेरचे षटक देण्यात जुगार होता.

मोहित शर्माचे मुख्य अस्त्र हे चेंडूचा वेग कमी करून गोलंदाजीचे आहे, पण त्याने चार सुरेख यॉर्कर टाकल्यावर नेहराने नको तो सल्ला द्यायला ड्रिंक घेऊन राखीव खेळाडूला पाठवले आणि मोहित शर्मा लय घालवून बसला. पंड्या हे थांबवू शकला असता. धोनीने गेल्या पंधरा वर्षांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप शिष्य तयार केले आहेत. या नेतृत्वगुणांवर पाऊल टाकत बाकीच्यांनी वाटचाल केली तर भारताचे भवितव्य उज्ज्वल आहेच. या गुरू-शिष्याच्या सामन्यात मात्र गुरूचे अव्वल स्थान ध्रुव तार्‍यासारखे अढळ राहिले.

– निमिष पाटगावकर

 

हेही वाचा; 

Back to top button