IPL 2023 : यंदाचे आयपीएल गाजवणारे जुने जाणते धुरंधर! | पुढारी

IPL 2023 : यंदाचे आयपीएल गाजवणारे जुने जाणते धुरंधर!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपल्या अव्वल कामगिरीच्या बळावर अनेक दिग्गज खेळाडूंनी मैदान गाजवले. वयामुळे रिफ्लेक्सेस कमी होतात, हे जरी खरे असले तरी अपेक्षा पूर्ण करण्यात हे खेळाडू अजिबात मागे पडले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर काही मोजक्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक द़ृष्टिक्षेप… (IPL 2023)

महेंद्रसिंग धोनी : 41 व्या वर्षी देखील धोनीची जादू कायम राहिली आहे. या पूर्ण हंगामात फक्त धोनीवरच स्पॉटलाईट राहिला असून तो यंदा निवृत्त होणार का, हा देखील कळीचा प्रश्न होता. यादरम्यान धोनीने चेन्नईला पाचव्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करून दिले आणि आपण निवृत्त होणार नाही, असे जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. यंदा त्याने 182 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना विशेषत: डावखुर्‍या गोलंदाजांना उत्तुंग षटकारही खेचले. चेन्नईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याचे पॉवर हिटिंग निव्वळ लाजवाब ठरले. (IPL 2023)

फाफ डू प्लेसिस : या दिग्गज फलंदाजाने यंदा 730 धावांची आतषबाजी करत धडाकेबाज फलंदाजी साकारली. 39 वर्षांचा असूनही त्याच्या फलंदाजीतील स्फोटकता कमी झालेली नाही, हे या हंगामात दिसून आले. यापूर्वी 2021 मध्ये देखील त्याने 633 धावा फटकावल्या. त्याची ऑरेंज कॅप मात्र अवघ्या दोन धावांनी हुकली होती. त्यावेळी शुभमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. यंदा प्लेसिसची सरासरी 56.15 व स्ट्राईक रेट 153.68 इतके राहिले आहे.

शिखर धवन : पंजाब किंग्जच्या या कर्णधाराने यंदा 37 व्या वर्षी देखील पूर्वीसारखीच तडफ दाखवत ताज्या दमाने राष्ट्रीय संघाचे दरवाजे आणखी एकदा ठोठावले. राजस्थानविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या सामन्यात धवनची 56 चेंडूंत 86 धावांची खणखणीत खेळी कौतुकास्पद ठरली. मागील सात वर्षांत त्याने प्रत्येक आयपीएल हंगामात किमान 450 धावा फटकावल्या आहेत. यंदा त्याने 373 धावांचे योगदान दिले.

इशांत शर्मा : कसोटीतील रिव्हर्स स्विंग मास्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इशांत शर्माला यंदा दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना करारबद्ध केले. 2 मे रोजी झालेल्या लढतीत त्याने शेवटच्या षटकात 12 धावांचे संरक्षण करत आश्चर्याचा धक्का दिला. त्याने हंगामात 8 सामन्यांत 10 बळी नोंदवले.

अमित मिश्रा : 40 व्या वर्षीही आपल्या फिरकीची जादू कमी झालेली नाही, हे दाखवून देण्यात अमित मिश्रा अजिबात मागे पडला नाही. उलटपक्षी, त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये मलिंगाला पिछाडीवर टाकत तिसरे स्थान मिळवले. यंदा त्याने 7 सामन्यांत 7 बळी घेतले.

अजिंक्य रहाणे : लवकरच 35 व्या वर्षात पदार्पण करणार्‍या अजिंक्य रहाणेला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत नवसंजीवनी लाभली. क्लासिकल फलंदाजी हीच ओळख असलेल्या रहाणेने टी-20 क्रिकेटला आवश्यक आक्रमकपणा देखील आपल्याकडे आहे, हे यंदा दाखवून दिले. त्याने 172 च्या स्ट्राईक रेटने 16 षटकारांसह 326 धावांची आतषबाजी केली. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर त्याला राष्ट्रीय संघात स्थान लाभले.

मोहित शर्मा : गतवर्षी मोहित नेट बॉलर होता. यंदा त्याने 14 सामन्यांत 27 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. 8.17 च्या इकॉनॉमीसह त्याने प्रभावी मारा साकारला. त्याची पर्पल कॅप मात्र किंचित फरकाने हुकली. टायटन्सने त्याला 50 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. मोहितने मुंबई इंडियन्सविरुद्ध 2.2 षटकांत 10 धावांत 5 बळी घेत चमत्कार घडवला. सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उडवत त्यानेच मुंबईच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा-अपेक्षांना मोठा सुरुंग लावला होता.

पीयुष चावला : 34 वर्षीय लेगस्पिनर पीयुष चावला यंदा मुंबईतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 8 सामन्यांत 17.38 च्या सरासरीने 13 बळी घेतले. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 7.29 इतकी राहिली. मुंबईला प्ले ऑफपर्यंत नेण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला.

डेव्हिड वॉर्नर : यंदा 36 वर्षीय वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सतर्फे 516 धावांची आतषबाजी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 131 इतका राहिला. वॉर्नरला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल व अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी निवडले गेले, यावर टीका झाली आहे. पण, वॉर्नरने आपला धडाका कायम राहील, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे.

हेही वाचा; 

 

Back to top button