Wrestlers Protest : जागतिक दबाव वाढला | पुढारी

Wrestlers Protest : जागतिक दबाव वाढला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन केले. या प्रकरणात आता जागतिक ऑलिम्पिक समितीने उडी घेतली असून दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दांत फटकारले आहे. वर्ल्ड कुस्ती फेडरेशन भारतीय कुस्ती महासंघाला निलंबनाचा इशारा दिला होता. यापाठोपाठ आता आयओसीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्यामुळे सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. (Wrestlers Protest)

जागतिक ऑलिम्पिक समितीने दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दांत फटकारले आहे. आयओसीने आपल्या वक्तव्यात म्हटले की, भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक ही अत्यंत वाईट आणि हादरवणारी होती. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी आयओेसीने मागणी केली.’ (Wrestlers Protest)

याचबरोबर आयओसीने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसांत निवडणूक घेतली नाही तर बंदी घालण्याची धमकीदेखील दिली आहे. आयओसीने भारतीय कुस्ती महासंघावर कारवाई करण्याबाबत देखील वक्तव्य केले. ‘जेव्हापासून कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत तेव्हापासून आम्ही जागतिक कुस्ती संघटनेच्या संपर्कात आहोत.

त्यांनी या प्रकरणाची दखल घेत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आयओसीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत राहून जागतिक कुस्ती संघटनेच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचे समर्थन करते.’

हेही वाचा;

Back to top button