IPL 2023 : २१ चेंडूत १७ डॉट, ५ रन्स, ५ विकेटस् | पुढारी

IPL 2023 : २१ चेंडूत १७ डॉट, ५ रन्स, ५ विकेटस्

चेन्नई : लखनौ सुपर जायंटस्विरुद्धच्या सामन्यात आकाश मधवालने 3.3 षटकांत 21 चेंडू टाकले. या 21 चेंडूंत तब्बल 17 डॉट बॉल टाकले आणि केवळ पाच धावा देऊन पाच विकेटस् घेतल्या, तर मैदानावर किती दहशत आणि टेन्शन असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आकाश मधवालने हे करून दाखवले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंटस्चा धुव्वा उडवला. मुंबईच्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने अवघ्या 101 धावांत गाशा गुंडाळला. (IPL 2023)

उत्तराखंडच्या रूरकी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय आकाशसाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता. 25 नोव्हेंबर 1993 रोजी जन्मलेल्या आकाशचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. इंजिनिअरिंग केल्यानंतर आकाशला क्रिकेटर होण्याचा मोह जडला. त्याआधी तो फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत त्याने लेदर बॉल हातातही घेतला नव्हता. त्याने कधी प्रशिक्षणही घेतले नाही. (IPL 2023)

एके दिवशी तो अचानक उत्तराखंड संघाच्या ट्रायल्ससाठी पोहोचला. जिथे प्रशिक्षक मनीष झा त्याच्यापासून खूप प्रभावित झाले. त्यानंतर त्याला टीममध्ये सामील करण्यात आले आणि आकाशला त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली. टेनिस बॉलने खेळल्यामुळे आकाशकडे वेग होता, ज्याचा फायदा त्याला आता झाला आहे.

दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या जागी आकाश मधवालचा गेल्या सिझनमध्ये म्हणजेच 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला होता. पण, एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळी त्याला संघाने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये कायम ठेवले आणि आता या स्वस्त खेळाडूने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मौल्यवान काम केले. तो जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत हाहाकार माजवत आहे. त्याच्या लहान उंचीमुळे फसव्या चेंडूवर फलंदाज मार खात आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर मुंबईचा पुढचा बुमराह म्हणून त्याला बघितले जात आहे.

चेन्नईच्या मैदानात आकाश मधवाल नावाची दहशत

रोहितभाई मस्त बंदा है..

मुंबई इंडियन्स संघातून दरवर्षी एक मॅचविनर युवा खेळाडू पुढे येतो त्याचे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा हा नवनवीन खेळाडूंना पुढे आणतो. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेला रोहित सुरुवातीच्या काळात खेळाडूंवर असलेला कामगिरीचा दबाव कमी करतो, त्यांना पाठिंबा देतो. तू फक्त तुझा नैसर्गिक खेळ कर, संघातील जागेचा विचार माझ्यावर सोडून दे… अशी हमी देतो, त्यामुळे युवा खेळाडू बिनधास्त खेळ करु शकतात. आकाशही याला अपवाद नाही. त्याला रोहितबद्दल विचारले असता तो म्हणाला… रोहितभाई मस्त बंदा है ! वो अगर साथ है तो टेन्शन नही रहता.

निकोलस पूरनच्या विकेटचा जास्त आनंद

सामना संपल्यानंतर आकाश म्हणाला, 2018 पासून मी या संधीची वाट पाहत होतो. उर्वरित सामन्यांमध्येही अशीच कामगिरी करू, आम्हाला चॅम्पियन बनायचे आहे आणि आमचे डोळे जेतेपदावर आहेत. मला सर्वाधिक आनंद पुरणच्या विकेटचा मिळाला.

हेही वाचा; 

Back to top button