UPSC Exam : २८ मे रोजी केंद्रीय नागरी सेवा परीक्षा; १५ हजार परीक्षार्थी ४० केंद्र | पुढारी

UPSC Exam : २८ मे रोजी केंद्रीय नागरी सेवा परीक्षा; १५ हजार परीक्षार्थी ४० केंद्र

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा रविवार दि. 28 मे रोजी नागपूर येथील 40 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण 14881 परीक्षार्थी बसणार आहेत.

पहिल्या सत्रात सकाळी 9. 30 से 11.30 व दुस-या सत्रात दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या यशस्वी आयोजनाकरीता सर्व 40 उपकेंद्रावर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय संघ लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार होण्याकरीता प्रत्येक उपकेंद्राकरीता 1 स्थानिक निरीक्षण अधिकारी असे एकूण 40 स्थानिक निरीक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2023 करीता संघ लोकसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम सत्राकरीता सकाळी 9.20 वाजेपर्यंत तर द्वितीय सत्राकरीता दुपारी 2.20 वाजेपर्यंतच देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परीक्षार्थीस परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षार्थ्यांना आयोगाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा देता येणार आहे. या बदलाबाबत परीक्षार्थीनी नोंद घेऊन त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच उपस्थित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे आवाह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Back to top button