IPL 2023 : प्ले ऑफमधून बाहेर पडलेल्या संघांनी दिले सात स्टार खेळाडू | पुढारी

IPL 2023 : प्ले ऑफमधून बाहेर पडलेल्या संघांनी दिले सात स्टार खेळाडू

मुंबई; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील टॉप-4 संघ निश्चित झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंटस् यांनी शानदार कामगिरी करत पॉईंट टेबलच्या टॉप-4 मध्ये स्थान मिळवले आहे. सहा संघ लीग टप्प्याच्या पुढे जाऊ शकले नाहीत. मात्र, या 6 संघांमधून 7 भावी स्टार्स उदयास आले असून त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. या खेळाडूंमध्ये 4 फलंदाज आणि 3 गोलंदाज आहेत. त्यांना लवकरच टीम इंडियामध्ये प्रवेश मिळू शकतो.

रिंकू सिंग : चांगला फिनिशर, मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये डाव सावरण्यात हातखंडा. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगने गुजरातविरुद्ध 5 चेंडूंत 5 षटकार ठोकून आपले नाव कोरले आहे. 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणार्‍या रिंकूने या हंगामात केकेआरसाठी सर्वाधिक 474 धावा केल्या आहेत.

यशस्वी जैस्वाल : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर असलेल्या 21 वर्षीय यशस्वी जैस्वालचा खेळ पाहिल्यानंतर अनेक क्रिकेटतज्ज्ञ आणि दिग्गजांनी हा तरुण भारतीय संघाचा भविष्यातील स्टार असल्याचे सांगितले आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वीने सर्वाधिक धावा केल्या. तसेच त्याने शतक झळकावले. यशस्वी हा रिंकू सिंगसह इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझनचा प्रबळ दावेदार आहे.

प्रभसिमरन सिंग : हा खेळाडू स्फोटक सलामीवीर असून मधल्या षटकांमध्येही झटपट धावा करू शकतो. आयपीएलमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर त्याला या हंगामात 2 हून अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली. 2019 ते 2022 पर्यंत प्रभसिमरन फक्त 6 सामने खेळू शकला. पण या हंगामात त्याने पूर्ण 14 सामने खेळले. त्याने एका शतकासह 358 धावा चोपल्या आहेत. अशा स्थितीत त्याचा लवकरच भारत-अ संघात समावेश होऊ शकतो.

जितेश शर्मा : उत्कृष्ट यष्टिरक्षणाबरोबरच पल्लेदार फटके कसे मारायचे याची कला जीतूला चांगलीच अवगत आहे. पंजाब किंग्जचा हा खेळाडू विदर्भातून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो 2017 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. वास्तविक, त्याने पंजाब किंग्जकडून 2022 मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला. त्याने चालू हंगामात 12 सामन्यांमध्ये 156 च्या स्ट्राईक रेटने 234 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणासोबतच फिनिशरची भूमिकाही बजावली.

मयंक मार्कंडे : हैदराबादचा लेगस्पिनर असलेला हा गुणी खेळाडू प्रामुख्याने मधल्या षटकांत विकेट घेण्यात कर्तबगार मानला जातो. भुवनेश्वर कुमारनंतर मार्कंडेने संघाकडून सर्वाधिक बळी घेतले. 25 वर्षीय फिरकीपटूने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामानंतर, 2023 हा मार्कंडेसाठी पुनरागमनाचा हंगाम होता. 2018 मध्ये मार्कंडेने 14 सामन्यांत 21 विकेटस् घेतल्या. त्याचबरोबर मार्कंडेच्या या हंगामात 10 सामन्यांत 12 विकेटस् आहेत.

विजयकुमार वैशाख : आरसीबीचा वेगवान गोलंदाज वैशाखने त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच शानदार गोलंदाजी करत 7 सामन्यांत 9 विकेटस् घेतल्या. तो कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटही खेळतो. वेगवान गोलंदाजीसोबतच बाऊन्सर आणि यॉर्करवरही त्याची चांगली पकड आहे. त्याला नव्या चेंडूचा फायदा घ्यायला शिकावे लागेल. मोहम्मद सिराजप्रमाणे टीम इंडियामध्ये सामील होण्याची क्षमता त्याच्यात आहे.

सुयश शर्मा : या 20 वर्षीय तरुण गोलंदाजाने या हंगामात प्रशिक्षक आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. उजव्या हाताच्या लेग-स्पिनरने 11 सामन्यांत 10 विकेटस् घेतल्या. सुयशने शानदार गुगली टाकली. दिल्ली क्लब क्रिकेटपासून सुरुवात करणार्‍या सुयशमध्ये टीम इंडियाचा भाग होण्याची क्षमता आहे. टीम इंडियाला नेहमीच रिस्ट स्पिनरची गरज असते, त्यामुळे जर सुयशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर तो लवकरच भारत-अ संघाचा भाग बनू शकतो.

हेही  वाचा; 

Back to top button