WTC Final 2023 : टीम इंडियाला लागले वेध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे | पुढारी

WTC Final 2023 : टीम इंडियाला लागले वेध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केल्यामुळे आरसीबीचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तथापि, ती सल दूर ठेवून आता विराट कोहलीसह अन्य खेळाडू आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीस लागले आहेत. (WTC Final 2023)

आरसीबीला गेल्या 16 हंगामांत एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. यंदाच्या हंगामात विराट तुफान फॉर्ममध्ये होता. त्यामुळे आरसीबी फॅन्सना यंदा विजेतेपदाची प्रतीक्षा संपेल, अशी आस होती. मात्र, त्यांची निराशा झाली. आरसीबी फॅन्ससह संघासाठी जीव तोडून खेळणार्‍या विराटचीदेखील निराशा झाली. पराभवानंतर विराट थोडाचा भावनिक झाल्याचेही दिसले. आता आरसीबीच्या पराभवाचे दुःख बाजूला सारून विराट आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी पुढच्या मिशनसाठी आपली कंबर कसली आहे. हे दोघेही इंग्लंडला रवाना झाले आहेत. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. भारतीय कसोटी संघातील 10 खेळाडू आणि कोच राहुल द्रविड, सपोर्ट स्टाफ आधीच इंग्लंडला रवाना झाले आहेत. (WTC Final 2023)

अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन हेही इंग्लंडला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या आठवड्याच्या शेवटी चेतेश्वर पुजारादेखील संघात सामील होईल. तो सध्या इंग्लंडमध्येच असून ससेक्सकडून कौंटी खेळत आहे. रोहित शर्मा, इशान किशन, मोहम्मद शमी, शुभमन गिल, के.एस. भरत आणि अजिंक्य रहाणे सध्या प्ले ऑफ खेळत आहेत

भारताने 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशच आले आहे. भारतीय संघ दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्याला न्यूझीलंडने दणका दिला होता. यंदा डब्लूटीसीची फायनल खेळणार्‍या भारतीय संघात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल या तगड्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. ते दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत.

हेही वाचा;

Back to top button