पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा जगातील पहिल्या क्रमांकाचा भालाफेक करणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. देशातील एकही खेळाडू आजपर्यंत पहिल्या क्रमांकावर पोहोचला नव्हता. जागतिक ऍथलेटिक्सने जारी केलेल्या क्रमवारीत नीरज 1455 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्याने ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला 22 गुणांनी मागे टाकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा झेक रिपब्लिकचा जेकोब वडलेज 1416 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
25 वर्षीय नीरज 30 ऑगस्ट 2022 पासून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. पीटर्स हा जगातील अव्वल क्रमांकाचा भालाफेकपटू होता, परंतु 5 मे रोजी दोहा येथे 88.67 मीटरसह सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याने पीटर्सच्या स्थानी झेप घेतली. पीटर्सने दोहामध्ये 85.88 मीटर भाला फेक करून तिसरे स्थान पटकावले होते. नीरजने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झुरिच (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या डायमंड लीगची अंतिम फेरीही जिंकली होती. 89.94 मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा नीरज आता 4 जून रोजी नेदरलँड्समध्ये होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स कोएन गेम्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येईल. यानंतर तो 13 जून रोजी तुर्कू (फिनलंड) येथे पावो नूरमी गेम्समध्ये खेळणार आहे. तेथे त्याने गेल्या वर्षी रौप्यपदक जिंकले होते.
टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता झेक रिपब्लिकचा याकुब वाल्देझे तिसऱ्या, युरोपियन चॅम्पियन जर्मनीचा ज्युलियन वेबर चौथ्या आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम पाचव्या स्थानावर आहे. भारताचा रोहित यादव (15) आणि डीपी मनू (17) टॉप २० मध्ये आहेत.
हेही वाचा :