IPL 2023 Centuries : आयपीएलच्या साखळी सामन्यांत पहिल्यांदाच एका हंगामात 11 शतके, जाणून घ्या आकडेवारी | पुढारी

IPL 2023 Centuries : आयपीएलच्या साखळी सामन्यांत पहिल्यांदाच एका हंगामात 11 शतके, जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Centuries : आयपीएलचा 16 वा हंगाम अनेक अर्थांनी खास ठरला असून एकूण 11 शतकांसह स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही आयपीएल सीझनमध्ये 8 पेक्षा जास्त शतके झाली नव्हती. विराट कोहली आणि शुभमन गिल या स्टार फलंदाजांनी या मोसमात 2-2 वेळा तीन आकडी धावसंख्या गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये शतक झळकावणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

ब्रूकने मोसमातील पहिले शतक झळकावले

हंगामाती पहिले शतक सनरायडर्स हैदराबादचा (SRH) फलंदाज हॅरी ब्रूकने झळकावले. त्याने लीगच्या 19 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध संस्मरणीय खेळी केली. या इंग्लिश फलंदाजाने 55 चेंडूत नाबाद 100 धावा फटकावल्या. या शतकामुळे हैदराबाद संघाला मोठी धावसंख्या (228/4) करण्यात यश आले आणि या संघाने तो सामना 23 धावांनी जिंकला.

वेंकटेशने केकेआरसाठी 15 वर्षांनंतर झळकावले दुसरे शतक

गेल्या हंगामात खराब कामगिरीनंतर केकेआरच्या व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2023 मध्ये शानदार पुनरागमन केले. या फलंदाजाने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध आपले पहिले आयपीएल शतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 104 धावा केल्या. मात्र, केकेआरने तो सामना गमावल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. ब्रेंडन मॅक्क्युलमनंतर केकेआरसाठी शतक झळकावणारा अय्यर हा दुसरा फलंदाज ठरला. मॅक्युलमने आयपीएलच्या इतिहासातील पहिल्याच सामन्यात नाबाद 158 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

यशस्वी जैस्वालने रचला इतिहास

राजस्थान रॉयल्सचा (आरआर) युवा आणि प्रतिभावान फलंदाज यशस्वी जैस्वाल या हंगामात धडाकेबाज कामगिरी केली. आरआरच्या या सलामीवीराने एमआयविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर 62 चेंडूत 124 धावांची संस्मरणीय खेळी केली. आयपीएलमधील अनकॅप्ड खेळाडूची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 21 वर्षे आणि 123 दिवसांच्या वयात शतक झळकावून जैस्वाल आरआरसाठी सर्वात तरुण शतकवीर ठरला.

प्रभासिमरनने डीसीविरुद्ध शतक ठोकले

पंजाब किंग्जचा (PBKS) सलामीवीर प्रभसिमरन सिंगने लीगच्या 59 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 61 चेंडूत शंभर धावांचा पल्ला गाठला. तो 65 चेंडूत 103 धावा करण्यात यशस्वी झाला. या शतकी खेळीत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार ठोकले आणि आयपीएलमध्ये शतक पूर्ण करणारा सहावा सर्वात तरुण खेळाडू (22 वर्षे आणि 276 दिवस) ठरला.

मुंबईचा ‘सूर्या’ तळपला

मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरला. त्याच्या या खराब फॉर्मचा जोरदार टीका झाली. पण सूर्याने शानदार पुनरागमन केले. गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध लीगच्या 57 व्या सामन्यात त्याने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले. त्याने 49 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे एमआयला तो सामना 27 धावांनी जिंकता आला.

विराट कोहलीची सलग 2 शतके

संघाच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांमध्ये दोन बॅक टू बॅक शतके झळकावत कोहलीने आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ केला. त्याआधी त्याचे शेवटचे आयपीएल शतक 2019 मध्ये झाले होते. यंदाच्या हंगामात त्याने हैदराबाद विरुद्ध 63 चेंडूत 100 आणि त्यानंतर जीटीविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 101 धावांची शानदार खेळी केली. आयपीएलमध्ये सलग शतके करणारा कोहली शिखर धवन (2020) आणि जोस बटलर (2022) यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

शुबमन गिलचा धमाका

कोहलीच्या लयशी बरोबरी साधत गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 2 शतके झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने एसआरएच विरुद्ध 58 चेंडूत 101 आणि त्यानंतर आरसीबी विरुद्ध 52 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी साकारली. या शतकांव्यतिरिक्त गिलने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध नाबाद 94 धावा केल्या.

कॅमेरून ग्रीनच्या शतकाने एमआय प्लेऑफमध्ये निसटता प्रवेश

कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्ससाठी हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. ग्रीनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. 201 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीनची खेळी एमआयसाठी वरदान ठरली. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. एमआयसाठी शतक झळकावणारा ग्रीन सहावा फलंदाज ठरला.

Back to top button