IPL 2023 Playoffs Race : मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग खडतर, रोहितच्या संघापुढे ‘हा’ एकमेव मार्ग | पुढारी

IPL 2023 Playoffs Race : मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग खडतर, रोहितच्या संघापुढे ‘हा’ एकमेव मार्ग

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Playoffs Race : आयपीएल 2023 प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. गुजरात टायटन्स, सीएसके, एलएसजी या संघांनी प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता एक जागा शिल्लक असून यासाठी तीन संघांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. यात आरसीबी, मुंबए इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात अडचणीत आहे.

आज, रविवारी (21 मे) दोन सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन सामन्यांकडे आयपीएल चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण या दोन सामन्यांवरच प्लेऑफमधील चौथ्या संघाचे स्थान ठरवणार आहेत.

मुंबई टॉप-4 मध्ये कशी पोहोचणार?

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या 13 सामन्यांतून 14 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ आपल्या पुढच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. जर मुंबई संघाने हा सामना जिंकला तर त्याचे 16 गुण होतील. पण मुंबईसाठी समस्या त्यांच्या नेट रनरेटची आहे. सध्या कर्णधार रोहित शर्माच्या संघाचा धावगती -0.128 आहे. अशा स्थितीत मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.

मुंबईला धोका (IPL 2023 Playoffs Race)

यावेळी मुंबईला सर्वात मोठा धोका आरसीबीकडून आहे. RCB चे देखील मुंबई सारखेच 14 गुण आहेत, परंतु त्यांची धावगती +0.180 आहे. आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे. पुढील सामन्यात आरसीबीने गुजरातला हरवले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे.

एमआय आणि आरसीबीने सामना जिंकल्यास काय होईल?

मुंबई आणि आरसीबी या संघांचे 16 गुण होतील. पण चांगला रनरेट असलेला संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. सध्या आरसीबीचा वरचष्मा आहे. रनरेटच्या बाबतीत मुंबईला पुढे जाण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला किमान 79 धावांनी पराभूत करावे लागेल. पण मुंबईने 79 धावांपेक्षा मोठ्या फरकाने विजय मिळवला तरीही आरसीबीचा फायदा होईल. कारण ते त्यांची शेवटचा सामना मुंबईच्या सामन्यानंतर खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना आपला विजय किती फरकाने असायला हवा याची आकडेवारी समोर असेल.

मुंबई किंवा रॉयल चॅलेंजर्सपैकी एकच जिंकला तर काय होईल?

या स्थितीत सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये जाईल. राजस्थान शर्यतीतून बाहेर होईल. मुंबई इंडियन्ससाठी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

मुंबई आणि आरसीबी दोन्ही हरले तर काय होईल? (IPL 2023 Playoffs Race)

मुंबई आणि आरसीबीचा पराभव व्हावा अशा निकालाची राजस्थान रॉयल्स अपेक्षा असणार आहे. त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. असे झाल्यास मुंबई, आरसीबी आणि रॉयल्सचे 14 गुण होतील. खराब धावगतीमुळे मुंबई बाद होईल. आरसीबी आणि रॉयल्स यांच्यात चांगला रनरेट असलेला संघ प्लेऑफ गाठेल. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 180 धावा केल्या तर टायटन्सने 19.3 षटकांत किंवा त्यापूर्वी लक्ष्य गाठावे अशी रॉयल्सची इच्छा असेल. जर आरसीबी 180 धावां किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करत असेल तर त्यांना टायटन्सला 6 धावांनी किंवा त्याहून अधिक धावांनी मात द्यावी लागेल. अशा परिथितीत राजस्थानला फायदा होईल.

मुंबई-हैदराबाद सामन्याचा निकाल लागला नाही तर काय होईल?

अशी स्थिती उद्भवल्यास आणि आरसीबीने त्यांचा शेवटचा सामना जिंकल्यास ते आपसूकच आरसीबी पात्र ठरेल, जर आरसीबीने सामना गमावला तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचेल.

आरसीबी-टायटन्स सामन्यात निकाल लागला नाही तर?

या स्थितीत मुंबई जिंकल्यास पात्र ठरेल, अन्यथा आरसीबी प्लेऑफमध्ये जाईल.

दोन्ही सामन्यांचा निकाल लागला नाही तर?

अधिक चांगल्या धावसंख्येमुळे RCB पात्र ठरेल.

Back to top button