Ravi Shastri : ‘विराट, रोहितला टी-20 मधून डच्चू द्या’! शास्त्रींनी का दिला असा सल्ला? | पुढारी

Ravi Shastri : ‘विराट, रोहितला टी-20 मधून डच्चू द्या’! शास्त्रींनी का दिला असा सल्ला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि रोहित शर्मा ऐवजी युवा खेळाडूंना टी-20 फॉरमॅटच्या भारतीय संघात संधी देण्याची वेळ आली आहे. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा यांना आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळवावे असे, मत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका खास शोमध्ये त्यांनी हे विधान केले.

शास्त्री (Ravi Shastri) पुढे म्हणाले, ‘टीम इंडिया पुढे जे काही टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल त्यात युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी. त्यांना खडतर आव्हानांचा सामना करण्याची मुभा दिली पाहिजे. निवडकर्त्यांनी आतापासून अशा बेधडक खेळाडूंना तयार करावे. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे, हे दोघेही कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकतात हे सर्वांना माहीत आहे. आता भविष्यात नव्या आयपीएल स्टार्सना टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून विराट आणि रोहितला वनडे आणि कसोटीसाठी फिट ठेवता येईल,’ असा सल्ला त्यांनी बीसीसीआयला दिला.

दरम्यान, विराट आणि रोहित यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय भविष्याबद्दल थेट भाष्य केल्याने शास्त्री गुरुजींच्या (Ravi Shastri) या विधानावर काय प्रतिक्रिया उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. तर यंदा आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकापासून विराट आणि रोहित या दोघांनाही टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळी हार्दिक पंड्याकडे टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिकला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवायला हवे, असेही मत शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)चा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने 438 धावा केल्या आहेत, परंतु त्याचा स्ट्राइक रेट 131.53 आहे. दुसरीकडे, जर आपण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडे नजर टाकायची झाल्यास त्याने 128.65 च्या स्ट्राइक रेटने फक्त 220 धावा केल्या आहेत. रोहितची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. या दोघांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 नंतर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Back to top button