ICC Changed Rule: मैदानी पंचांची ‘मनमानी’ चालणार नाही! WTC फायनलपूर्वी ICC ने ‘हा’ नियम बदलला | पुढारी

ICC Changed Rule: मैदानी पंचांची 'मनमानी' चालणार नाही! WTC फायनलपूर्वी ICC ने ‘हा’ नियम बदलला

पुढारी ऑनलाईन डेस्क : icc changed rule : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. मात्र या फायनलपूर्वी आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे मैदानी पंच सॉफ्ट सिग्नल देऊ शकणार नाहीत. आंतरराष्ट्रीय खेळाची स्थिती पाहता आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याचाच अर्थ क्रिकेट चाहत्यांना डब्ल्यूटीसी फायनलमध्ये हा नियम पाहायला मिळेल.

गेल्या काही वर्षात आपण अनेकदा पाहिलं आहे की आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान सॉफ्ट सिग्नलमुळे अनेक निर्णय वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीसीने आता मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आयसीसीने हा नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने या नवीन बदलाची सुरुवात होईल. (icc changed rule)

सौरव गांगुलीच्या समितीने दिली मान्यता

क्रीकबझच्या वृत्तानुसार, सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने या बदलास मान्यता दिली आहे. या विषयावर भारत आणि ऑस्ट्रेलियाकडूनही मत घेण्यात आले. याशिवाय आयसीसीने आणखी दोन मोठे बदल केले आहेत. कमी प्रकाशामुळे कसोटी सामने रद्द करण्यात येतात. मात्र, आता असे होणार नाही. वेळेआधी कोणत्याही कारणास्तव प्रकाश कमी झाल्यास फ्लड लाइटचा वापर केला जाणार आहे. याशिवाय एकमेव सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात येणार आहे. (icc changed rule)

सॉफ्ट सिग्नलबाबत अनेक वाद झाले आहेत. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टॉक्स आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन यांनीही यावर आपले वक्तव्य केले आहे. आयसीसीने सॉफ्ट सिग्नल रद्द करावा आणि तिस-या पंचांनी निर्णय द्यावा, कारण त्यांच्याकडे अनेक तांत्रिक उपकरणे आहेत, असे सर्वांचे म्हणणे होते.

सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?

सॉफ्ट सिग्नल हा असा नियम आहे जेव्हा मैदानानी पंचांना निर्णय द्यावा लागायचा. म्हणजेच एखादा झेल क्लीन झाला नसला तरी पंचांना आऊट किंवा नॉट आऊटचा सॉफ्ट सिग्नल द्यावा लागत होता. यानंतर तिसरे पंच कॅमेरा फुटेजमधून हा झेल पहायचे. पण जर तिसरे पंच देखील यावर निर्णय घेऊ शकत नसेल तर शेवटी त्यांना मैदानावरील पंचाच्या निर्णयानुसार जावे लागायचे. म्हणजेच मैदानी पंचांनी आऊट दिले असेल तर बॅटर आऊट असायचा आणि नॉट आउट दिला असेल तर तो नॉट आऊट असायचा. अशा परिस्थितीत इतके तंत्रज्ञान असतानाही तिसरे पंच निर्णय का घेऊ शकत नाहीत, असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता मैदानावर उभे असलेले पंच सॉफ्ट सिग्नल देणार नसून हा निर्णय तिसरे पंच देतील असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. (icc changed rule)

स्टोक्सच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 2021 च्या आयसीसी फोरममध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. शाह हे आयसीसी क्रिकेट समितीचाही एक भाग आहेत.

Back to top button