Rinku Singh Record : रिंकू सिंहने मोडला आंद्रे रसेलचा विक्रम! सूर्यकुमारलाही टाकले मागे | पुढारी

Rinku Singh Record : रिंकू सिंहने मोडला आंद्रे रसेलचा विक्रम! सूर्यकुमारलाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंहने (rinku singh) यंदाच्या आयपीएल हंगामात धडाकेबाज कामगिरी केली आहे. केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. असे असले तरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो मेहनत घेत आहे. रविवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या (CSK) सामन्यातही त्याने 43 चेंडूत 54 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासह रिंकूच्या नावावर यंदाच्या मोसमात 407 धावा जमा झाल्या आहेत. तो आता आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये पोहोचला आहे.

यासह रिंकूने पाचव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याचा सहकारी आंद्रे रसेलला मागे टाकले आहे. अजूनही किरॉन पोलार्ड, डेव्हिड मिलर आणि दिनेश कार्तिकसारखे खेळाडू त्याच्या पुढे आहेत.

2019 च्या हंगामात रसेलने पाच किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी करताना 11 सामन्यांमध्ये 406 धावा फटकावल्या होत्या. मात्र, रिंकू सिंहने 16 हंगामात अवघ्या 13 व्या सामन्यात विंडिजच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडीत काढला आहे.

आयपीएलच्या एकाच हंगामात पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतात सर्वाधिक धावा फटकावणारे फलंदाज…

472 – दिनेश कार्तिक, 2018 (15 डाव)
437 – डेव्हिड मिलर, 2022 (14 डाव)
419 – किरॉन पोलार्ड, 20013 (17 डाव)
407* – रिंकू सिंह, 2023 (13 डाव)
406 – आंद्रे रसेल, 2019 (11 डाव)

या हंगामात धावांचा पाठलाग करताना रिंकूचा विक्रम आणखी सरस ठरला आहे. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना 13 पैकी 6 डाव खेळले असून सरासरी 119 आणि 167.60 च्या स्ट्राईक रेटने 238 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. धावांचा पाठलाग करताना त्याच्या नावावर आणखी एक विशेष कामगिरीची नोंद झाली आहे. त्याने यावर्षी सर्वाधिक षटकार खेचले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या 54 धावांच्या खेळीत रिंकूने तीन गगनचुंबी षटकार ठोकले, ज्यासह त्याच्या नावावर आयपीएल 2023 मध्ये पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद झाली आहे. त्याने या प्रकरणात सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.

आयपीएल 2023 मध्ये पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

रिंकू सिंह : 18
सूर्यकुमार यादव : 17
निकोलस पूरन : 16
फाफ डुप्लेसी : 14

Back to top button