DC vs PBKS : दिल्लीची नौका बुडाली, पंजाबची मात्र तरली | पुढारी

DC vs PBKS : दिल्लीची नौका बुडाली, पंजाबची मात्र तरली

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 167 धावांत रोखल्यावर दिल्लीने पहिल्या 6 षटकांत नाबाद 65 धावा चोपल्या होत्या. मात्र, त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीला पंजाबच्या फिरकीची नजर लागली. दिल्लीचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी गेले. अखेर पंजाबने दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 136 धावांवर रोखत सामना 31 धावांनी जिंकला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 30 धावांत 4 तर राहुल चहर आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. या विजयाबरोबरच पंजाबने आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले. ते आता 12 गुण घेत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. दिल्लीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. (DC vs PBKS)

पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या पर्वातील हे पाचवे शतक ठरले. त्याने 65 चेंडूंत 103 धावा करताना 10 चौकार व 6 षटकार खेचले.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इशांत शर्माने हा निर्णय योग्य ठरवताना पंजाबच्या शिखर धवन (7) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (4) यांना 32 धावांत माघारी पाठवले. प्रभसिमरन सिंग एका बाजूने चांगली फटकेबाजी करत होता. फॉर्मात असलेल्या जितेश शर्माला (5) अक्षर पटेलने त्रिफळाचीत करून पंजाबला तिसरा धक्का दिला.

प्रभसिमरन आणि सॅम कुरेन यांनी पंजाबच्या डावाला आकार देताना अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. प्रभसिमरननेही 42 चेंडूंत आयपीएलमधील दुसरे अर्धशतक झळकावले. प्रभसिमरनने चांगली फटकेबाजी करताना संघाला 13.1 षटकांत तिहेरी पल्ला गाठून दिला. 72 धावांची ही भागीदारी प्रवीण दुबेने कुरेनला (20) बाद करून तोडली. त्यानंतर आलेला हरप्रीत ब्रार 2 धावांवर कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, प्रभसिमरन दणदणीत फटके खेचत होता आणि त्याने शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 10 चौकार मारले.

प्रभसिमरन सोडून फक्त दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. सिकंदर रझा (11) नाबाद राहिला. दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी चांगला मारा केल्यामुळे पंजाबला 20 षटकांत 7 बाद 167 धावाच करता आल्या.

हेही वाचा;

Back to top button