Beed ST Bus : एकाच दिवसात दिड लाख प्रवासी, कोटीचे उत्पन्न; एसटी महामंडळाचा बीड विभाग सुसाट | पुढारी

Beed ST Bus : एकाच दिवसात दिड लाख प्रवासी, कोटीचे उत्पन्न; एसटी महामंडळाचा बीड विभाग सुसाट

बीड, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात डबघाईस आलेल्या एसटी महामंडळाची गाडी आता सुसाट धावताना दिसतेय. बीड विभागाला बुधवार (दि.10) एकाच दिवसात तब्बल 1 लाख 40 हजार 799 प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटीला 1 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून शासनाने प्रवाशांना विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत. याबरोबरच सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईची धामधुम असल्याने बसेस पूर्ण क्षमतेने धावत आहेत. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने 17 एप्रिल ते 15 जुनपर्यंत 66 फे र्‍या विविध मार्गावर नव्याने सुरु केल्या आहेत. यामुळे बीड विभागाचे उत्पन्न वाढतांना दिसत आहे. विशेषतः गर्दी असणार्‍या मार्गावर म्हणजेच बीड ते कराड-चिपळुन, बीड पुणे, परळी-पुणे, धारुर – पुणे, माजलगाव-पुणे, अंबाजोगाई पुणे या गाड्या नव्याने सुरु झाल्या असून याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, बीड विभागातील 8 आगारांद्वारे 466 बसेसचा वापर करुन दि.10 मे रोजी 1 लाख 92 हजार किलोमीटरची वाहतूक करण्यात आली. या दिवशी 1 लाख 40 हजार 799 प्रवाशांनी प्रवास केला असून यातून महामंडळास 1 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. याबद्दल विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सर्व वाहक, चालक, अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button