Yashasvi Jaiswal ची होणार टीम इंडियात एन्ट्री! ‘या’ मालिकेत मिळू शकते संधी | पुढारी

Yashasvi Jaiswal ची होणार टीम इंडियात एन्ट्री! ‘या’ मालिकेत मिळू शकते संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन शतके झाली असून त्यापैकी दोन भारतीय खेळाडूंनी फटकावली आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी (30 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जयस्वालने शतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल आता थेट बीसीसीआय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वेस्ट इंडिज आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत मिळू शकते संधी

यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) टीम इंडियात एंट्री कधी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल 28 मे रोजी संपणार आहे. यानंतर भारतीय संघ 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वालला त्या सामन्यासाठी संधी मिळणार नाही. पण भारतीय संघ पाच टी-20 आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी यशस्वी जयस्वालला टीम इंडियात स्थान मिळू शकते.

यावर्षी वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आता वनडेवर अधिक लक्ष केंद्रित करतील आणि युवा खेळाडूंना टी-20 मध्ये सातत्याने संधी दिली जाईल. अशात बीसीसीआय आणि निवड समितीची नजर जयस्वालवर नक्कीच असेल असा अंदाज आहे. पण यासाठी, आयपीएल 2023 च्या उर्वरित सामन्यांमध्ये जयस्वालने धमाकेदार कामगिरी करत राहणे आणि सतत धावा वसूल करणे आवश्यक आहे.

200 च्या स्ट्राईक रेटने फटकावल्या धावा (Yashasvi Jaiswal)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या रविवारच्या सामन्याबद्दल सांगायचे तर जयस्वालने 62 चेंडूत 124 धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 200 होता. या खेळीतील विशेष बाब म्हणजे जयस्वालने शतक झळकावले असले तरी संघातील अन्य एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा जोस बटलर होता, ज्याने 19 चेंडूत 18 धावा केल्या आणि संजू सॅमसनने 10 चेंडूत 14 धावा केल्या. जयस्वालमुळे राजस्थान रॉयल्सने 200 चा टप्पा ओलांडला, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाने धावा न केल्यामुळे त्यांना सामन्यात सहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता जयस्वाल अशा निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे जे शतक झळकावूनही पराभूत संघात होते.

Back to top button