WFI च्या वादात नीरज चोप्राची उडी, कुस्तीपट्टूंच्या मागणीला दिला पाठिंबा, कारवाईची मागणी | पुढारी

WFI च्या वादात नीरज चोप्राची उडी, कुस्तीपट्टूंच्या मागणीला दिला पाठिंबा, कारवाईची मागणी

पुढारी ऑनलाईन : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी विनेश फोगटसह अन्‍य सात कुस्तीपटूंनी (Wrestlers Plea Filed) केली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी कुस्तीपट्टूंचे दिल्‍लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. या कुस्तीपट्टूंना तात्काळ न्याय देण्यासाठी जलद कारवाई करण्याची मागणी करत ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने कुस्तीपट्टूंना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ट्विट नीरज चोप्रा याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

नीरज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागतो, हे पाहून मला वाईट वाटत आहे. त्यांनी राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि आम्हाला अभिमान वाटण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत.

एक राष्ट्र म्हणून, प्रत्येक व्यक्ती, खेळाडू असो वा नसो, त्याची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. जे घडत आहे ते कधीही घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निःपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. न्याय मिळेल याची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांने ट्विटरवरून म्हटले आहे.

कुस्तीपट्टूंच्या याचिकेची दखल, शुक्रवारी (दि.२८) सुनावणी

दरम्यान रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी करणारी विनेश फोगटसह अन्‍य सात कुस्तीपटूंनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि.२८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान सिंग यांच्याविरोधात वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेण्यास पोलिस तयार नाहीत. असे याचिकाकर्त्या कुस्तीपटूंकडून न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना देखील नोटीस बजावली आहे.

हेही वाचा:

Back to top button