World Chess Championship : नेपोम्नियाची-लिरेन ११ वा डाव बरोबरीत | पुढारी

World Chess Championship : नेपोम्नियाची-लिरेन ११ वा डाव बरोबरीत

अ‍ॅस्ताना; वृत्तसंस्था : रशियन ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाची व चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील 11 वा डाव बरोबरीत राहिला असून यासह नेपोम्नियाचीची एका गुणाची आघाडी कायम राहिली आहे. या स्पर्धेत एकूण 14 डाव खेळवले जाणार असून, सर्वप्रथम 7.5 गुण मिळवणारा ग्रँडमास्टर नवा जगज्जेता असणार आहे. तूर्तास, नेपोम्नियाचीच्या खात्यावर 6.5 गुण तर लिरेनच्या खात्यावर 5.5 गुण आहेत. (Nepomniachi-Liren 11th innings tied)

या स्पर्धेत आता फक्त 3 डाव बाकी असून नेपोम्नियाचीला जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केवळ एका गुणाची गरज आहे. पुढील सलग दोन डाव बरोबरीत राखले तर यातच तो जेतेपदावर आपली मोहर उमटवू शकतो. डिंग लिरेनला मात्र बाजी मारायची असेल तर सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. बारावी लढत जिंकली तरच लिरेन या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखू शकेल. ही लढत इयानने बरोबरीत राखली तर मात्र लिरेनच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसू शकतो. अशा परिस्थितीत तेरावी लढत बरोबरीत राखली तरी नेपोम्नियाचीसाठी जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते पुरेसे ठरू शकते. सोमवारी 11 व्या लढतीत नेपोम्नियाची पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळत होता. (Nepomniachi-Liren 11th innings tied)

रुई लोपेझच्या बर्लनी लाईनवर खेळवल्या गेलेल्या या डावात उभय ग्रँडमास्टर्सनी अवघ्या 1 तास 40 मिनिटांच्या खेळानंतर व 39 चालीतच बरोबरीला मान्यता दिली. डिंगने येथे सावध पवित्र्यावर अधिक भर दिला होता. नवव्या डावाप्रमाणेच या डावातही पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या नेपोकडे एक प्यादे जादा होते. मात्र, त्या लढतीत एण्डगेम बराच लांबला आणि येथे उभय ग्रँडमास्टर्सनी लवकरच बरोबरीला मान्यता दिली.

हेही वाचा;

Back to top button