Ajinkya Rahane : मेंटल स्पेस मिळाल्यामुळे रहाणेचा खेळ बदलला : ओझा | पुढारी

Ajinkya Rahane : मेंटल स्पेस मिळाल्यामुळे रहाणेचा खेळ बदलला : ओझा

Ajinkya Rahane : कासवाच्या स्टाईलने फलंदाजी करणारा अजिंक्य रहाणे हा यंदाच्या आयपीएलमध्ये हरणाच्या वेगाने फलंदाजी करू लागला आहे. त्याच्यातील हा बदल भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे; परंतु माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्या मते अजिंक्यमधील हा बदल त्याच्या मानसिकतेत झालेल्या बदलाचे फळ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली अजिंक्यला मेंटल स्पेस मिळाली त्यामुळे तो अधिक आक्रमक झाला आहे. (Ajinkya Rahane)

टी-20 मध्ये अजिंक्य रहाणेच्या करिअरचा स्ट्राईक रेट 120.50 इतका आहे. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या अजिंक्यने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, मी अजून पराभव स्वीकारलेला नाही. त्यानंतर काही दिवसांत अजिंक्यचे उत्तर सर्वांना मिळाले. आयपीएल 2023 मध्ये अजिंक्य नव्या अवतारात दिसतोय. गेल्या 3 हंगामांत त्याचा स्ट्राईक रेट 105 च्या पुढे कधी केला नाही, पण आता अजिंक्य पाचव्या गिअरमध्ये बॅटिंग करतोय. या हंगामात त्याचा स्ट्राईक रेट 199.05 इतका आहे. (Ajinkya Rahane)

रविवारी झालेल्या सामन्यात अजिंक्य गोलंदाजांवर तुटूनच पडला. त्याचा स्ट्राईक रेट 244.82 पर्यंत पोहोचला होता. मुंबईच्या या स्टार फलंदाजाने चेन्नईकडून खेळताना केकेआरविरुद्ध 29 चेंडूंत नाबाद 71 धावा केल्या. अजिंक्यमुळे चेन्नईने ईडन गार्डन्सवर टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. आयपीएलच्या या हंगामातील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. अजिंक्यने मैदानाचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही जिथे चेंडू गेला नसेल. 2016 नंतर अजिंक्यला आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला.

जुना अजिंक्य आणि नवा अजिंक्य यात मोठा फरक आहे. या वर्षी त्याने 9.54 चेंडूंत सरासरी 1 षटकार मारला आहे. याआधीचा त्याचे रेकॉर्ड 2019 मध्ये 31.67 इतके होते. गिअर चेंज करताना अजिंक्यने स्वत:चा खेळ बदलला नाही तर फक्त स्वत:ची ताकद वाढवली आहे. पाच वर्षांपूर्वी केन विलियम्सनने असेच केले होते. अजिंक्यने जलद गोलंदाजांविरुद्ध नेहमी चांगली फलंदाजी केली आहे, पण यावर्षी त्याचा स्ट्राईक रेट 254.16 इतका आहे. या हंगामात कमीत कमी 18 चेंडू खेळणार्‍या फलंदाजांमध्ये हा सर्वोत्तम आहे.

असं काय झालं की ज्याने अजिंक्य बदलला

अजिंक्यच्या फलंदाजीबद्दल बोलताना प्रज्ञान ओझा म्हणाले, अजिंक्य पहिल्यापासून तीनही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी जो बदल झाला आहे तो, त्याच्या माईंड सेटमधील आहे. भारताने आजपर्यंत तयार केलेल्या सर्वोत्तम ऑल फॉरमॅट खेळाडूंमध्ये अजिंक्यचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अजिंक्यला जी स्पेस हवी होती ती चेन्नई संघात मिळाली. त्यामुळे त्याने वेगळे काही केले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली अजिंक्यला फक्त मेंटल स्पेस मिळाली. त्याच्यावर कामगिरीचे दडपण नाही. तो मोकळेपणाने खेळू शकतो. त्या एका गोष्टीमुळे हा बदल दिसतो आहे.

हेही वाचा;

Back to top button