Refinery Project : रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग; बारसू-सोलगाव ग्रामस्थांचा विरोध | पुढारी

Refinery Project : रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग; बारसू-सोलगाव ग्रामस्थांचा विरोध

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरामध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. या परिसरामध्ये माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम सुरू होण्याच्या शक्यतेने या परिसरातील लोकांनी सड्यावर धाव घेतलीमात्र सोमवारी माती ड्रिलिंगचे काम काही सुरु झाले नव्हते. दरम्यान सड्यावर मोठ्यासंख्येने हजर झालेल्या ग्रामस्थांनी रिफायनरी रद्द झाली पाहीजे असा जोरदार पवित्रा घेतला.

दरम्यान प्रांताधिकारी वैशाली माने, तहसिलदार शितल जाधव यांनी आंदोलकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ सड्यावर ठिय्या मांडून होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याला ग्रामस्थांकडून विरोध केला गेल्यानंतर आता शासनाकडून बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यालाही या परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या हालचाली काहीशा थंडावलेल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा या हालचालींनी वेग घेतला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये बारसू-सोलगाव परिसरामध्ये माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम सुरू केले जाणार असल्याने तेथे लोकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाकडून मे महिना अखेरपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.प्रकल्पातील माती सर्व्हेक्षणाचे काम सुरु केले जाणार अशी जोरदार शक्यता होती प्रत्यक्षात सोमवारी हे काम सुरु झाले नव्हते आता ते केव्हा सुरु होणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले होते .मात्र, दुसर्‍या बाजूला हे काम रोखण्यासह रिफायनरी रद्दच्या मागणीसाठी मोठ्यासंख्येने महिला-पुरूषांसह तरूणांनी बारसू परिसराच्या सड्यावर ठिय्या मांडला.

गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील तापमान कमालीचे वाढले आहे. दुपारच्यावेळी उन्हातून बाहेर पडणे नकोसे वाटत आहे. अशा स्थितीतही या परिसरातील ग्रामस्थांनी बारसूच्या सड्यावर ठिय्या मांडला आहे. बारसूच्या परिसरातील सड्यावर ठिकठिकाणी विरोधक थांबलेले दिसत होते. प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत घरी परतणार नसल्याचा निर्धार त्यांच्याकडून व्यक्त केला जात होता. दरम्यान, रिफायनरी उभारणीला विरोध करीत ती रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ग्रामस्थ आणि शासन-प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे.

दरम्यान प्रकल्प विरोधात नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण आणि मंगेश चव्हाण दोघांना रविवारी पोलीसांनी अटक केली होती त्यान्ना येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीसांकडुन मिळाली तर पोलीसांकडुन एकुण पंचेचाळीस जणान्ना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात येणार असुन त्या पैकी पस्तीस जणान्ना रितसर नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पोलीसांकडुन प्राप्त झाली आहे सोमवारी बारसू कातळावर प्रकल्प विरोधक जमले होतेकोणताच अनुचीत प्रकार घडला नव्हताआता माती सर्व्हेक्षणाचे काम केव्हा सुरु होणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे .

Back to top button