Happy Birthday Sachin Tendulkar : हॅप्पी बर्थडे सचिन | पुढारी

Happy Birthday Sachin Tendulkar : हॅप्पी बर्थडे सचिन

मुंबई : वृत्तसंस्था : 24 एप्रिल 1973 चा दिवस. मुंबईतील साहित्य सहवास अपार्टमेंट मध्ये तेंडुलकर कुटुंबियात चौथ्या अपत्याचा जन्म झाला आणि त्यांनी या अपत्याला नाव दिले सचिन! दहा वर्षातच कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्डसवर पहिलावहिला आयसीसी विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि याचदरम्यान मुंबईच्या क्रिकेट पटलावर एका नव्या झंझावाताचा उदय झाला. त्या झंझावाताचे दुसरे नाव सचिन तेंडुलकर.

सचिनने 14 व्या वर्षापासूनच मुंबईतील स्थानिक क्रिकेट गाजवण्यास सुरुवात केली. धावांची भूक त्याला 16 व्या वर्षीच भारतीय संघात स्थान मिळवून देउन गेली. 1989 मध्ये पेशावरच्या भूमीत त्याने अब्दुल कादीरला पुढे सरसावत मारलेला षटकार कादीर आयुष्यभर विसरणे कठीण होते. सियालकोटमध्ये वकार युनूसच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाताना नाक रक्तबंबाळ झाले असतानाही सचिनने डाव थांबवला नाही. 1990 च्या दशकात सचिन आपल्या सर्वोच्च बहरात पोहोचला. एकामागोमाग एक माईलस्टोन सर करत गेला. ऑकलंडमध्ये 1994 साली वन डे क्रिकेटमध्ये सलामीला उतरत त्याने नव्या अध्यायाला सुरुवात केली. 1998 मध्ये शारजाहच्या भूमीत त्याचा वादळी झंझावात ऑस्ट्रेलियाला कधीच विसरता येणार नाही. पाकिस्तानविरुद्ध चेन्नई कसोटीतील सचिनची एकाकी झुंज, सिडनीत केवळ ऑनसाईडला फटके मारत साकारलेली 241 धावांची द्विशतकी खेळी आणि ग्वाल्हेरमधील वनडेत झळकावलेले पहिलेवहिले शतक हे त्याच्या कारकिर्दीतील निवडक माईलस्टोन्स.

या माईलस्टोन्सला सर्वोच्च कोंदण लाभले ते 2011 आयसीसी वनडे विश्वचषक जेतेपदाने/ पण, 2013 मध्ये अखेर तो क्षण आला, ज्यावेळी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. वानखेडे स्टेडियमवर त्याने आपली शेवटची इनिंग खेळली. त्याने या सामन्यानंतर केलेले संबोधन आजही अवघ्या तरुणाईसाठी आदर्शवत आहे. हाच सचिन आज 50 व्या वर्षात पदार्पण करतो आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होणे साहजिकच.

पाँटिंग म्हणतो, तांत्रिकदृष्ट्या सचिनच आजवरचा सर्वोत्तम फलंदाज

मी ज्या खेळाडूंसह खेळलो, त्या सर्वात सचिन तेंडुलकर तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम होता, असे प्रशंसोद्गार रिकी पाँटिंगने काढले. सचिनचे स्ट्रेट ड्राईव्ह सर्वोत्तम असायचे आणि अगदी फ—ंटफूटवर तो जितक्या सफाईने खेळायचा, तितकाच बॅकफूटवर देखील खेळायचा, याचा पाँटिंगने येथे उल्लेख केला. सचिन व विराट यांच्यात सध्या तुलना होउ शकत नाही. यासाठी विराट निवृत्त होईतोवर प्रतीक्षा करावी लागेल, असे पाँटिंग याप्रसंगी म्हणाला.

सचिनसाठी आम्ही सर्व जण संघाच्या बैठकीत सातत्याने रणनीती आखत गेलो, त्यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करत गेलो. पण, सामना भारतात असो किंवा ऑस्ट्रेलियात, सचिन नेहमीच सरस खेळ साकारत गेला. त्याला रोखणे आमच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरत गेले. प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. त्याच्या पिढीतील खेळाडू, प्रतिस्पर्धी वेगळे असतात. पण, मी ज्यावेळी खेळलो, त्यावेळी सचिन हाच सर्वोत्तम खेळाडू होता. सचिन वनडे क्रिकेट खेळत होता, त्यावेळी चेंडू रिव्हर्स स्विंग होत असे आणि अशा परिस्थितीत खेळणे आव्हानात्मक असायचे. पण, तरी सचिन सर्वांना उरुन पुरत असे. आज दुर्दैवाने आधुनिक क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंग नावापुरते बाकी राहिले आहे.

जेव्हा मुंबईत वादळी झंझावाताची पंचविशी साजरी झाली

दोनच दिवसांपुर्वी दि. 22 एप्रिल रोजी सचिनच्या शारजातील वादळी खेळीला 25 वर्षे पूर्ण झाली. शिवाय, तो पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने याचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियमवर केक कापून त्याचा आनंद साजरा करण्यात आला. दि. 22 एप्रिल 1998 रोजी सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 143 धावांची खेळी साकारत भारताला स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी पात्रता संपादन करुन दिली.

त्या खेळीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, यावर माझा विश्वास बसत नाही. माझी कन्या सारा आता 25 वर्षाची झाली आहे तर अर्जुन 23 वर्षाचा आहे. वेळ कशी निघून जाते, हे कळत देखील नाही, असे सचिन याप्रसंगी म्हणाला. सचिनची वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम मानली जाणारी 131 चेंडूतील 143 धावांची खेळी भारताला विजय मिळवून देउ शकली नव्हती. मात्र, त्या खेळीमुळे भारतीय संघ फायनलसाठी पात्र ठरला होता. अर्थात, सचिन इथवर अजिबात थांबला नव्हता. दोनच दिवसांनी झालेल्या फायनलमध्ये त्याने आणखी एक धुवांधार शतक साजरे करत आपला वाढदिवस अगदी थाटात साजरा केला. शारजाहमधील त्या दोन शतकांनी वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलला, असे सचिन नेहमी सांगत आला आहे.

Back to top button