Kohli vs Ganguly : 'विराटच्या मनात काय...’, कोहलीच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य | पुढारी

Kohli vs Ganguly : 'विराटच्या मनात काय...’, कोहलीच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli vs Ganguly : भारताचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL 2022) चालू हंगामात खराब फॉर्ममध्ये आहे. कोहलीने आतापर्यंत नऊ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याच्याशिवाय मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचीही (Rohit Sharma) बॅट चमकलेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांच्या खराब फॉर्मवर आपले मत मांडले आहे. ते एका मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

गांगुली म्हणाले, ‘विराट आणि रोहित दोघेही महान खेळाडू आहेत. मला खात्री आहे की ते लवकरच फॉर्ममध्ये पुनरागमन करतील. मला आशा आहे की त्यांची बॅट लवकरच धावा काढण्यास सुरुवात करेल. पण सध्या विराट कोहलीच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की तो पुन्हा फॉर्ममध्ये येईल आणि काही चांगल्या धावा करेल. तो एक महान खेळाडू आहे.’ (Kohli vs Ganguly)

कोहलीने नऊ सामन्यांमध्ये 16 च्या सरासरीने फक्त 128 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माने आठ सामन्यांत 153 धावांचे योगदान दिले आहे. या कालावधीत त्याची सरासरी 19.13 आहे. विराटप्रमाणेच रोहितच्या बॅटमधूनही अर्धशतक झळकलेले नाही. दरम्यान, गांगुली यांनी बोलताना, मी आयपीएल 2022 खूप बारकाईने पाहत आहे आणि दोन नवीन फ्रँचायझींच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रभावित झालो आहे, असे सांगितले. (Kohli vs Ganguly)

ते पुढे म्हणाले की, ‘मी आयपीएल पाहत आहे आणि ते खूप मनोरंजक आहे. प्रत्येकजण चांगला खेळत आहे. कोणताही संघ जिंकू शकतो. दोन नवीन संघ गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स चांगली कामगिरी करत आहेत,’

गुजरात टायटन्स फक्त एक सामना गमावलेला आहे. त्यांनी आठपैकी सात सामने जिंकले असून 14 गुणांसह हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सही चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे 10 गुण जमा झाले आहेत.

विराटच्या बॅटमधून IPL मधील शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 झळकले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर डे-नाईट कसोटीत बांगलादेशविरुद्ध शतक फटकावले. तेव्हापासून आतापर्यंत 100 हून अधिक सामने झाले तो खेळला आहे. पण अनेक वर्षांपासून विराटला बॅट उंचावण्यात अपयश आले आहे. विराटने IPL 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याला आयपीएलच्या एकाच मोसमात एकदाच 500 हून अधिक धावा करता आल्या आहेत. (Kohli vs Ganguly)

Back to top button