Venkatesh Iyer : तब्बल १५ वर्षानंतर व्यंकटेशची बॅट तळपली… | पुढारी

Venkatesh Iyer : तब्बल १५ वर्षानंतर व्यंकटेशची बॅट तळपली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने आज (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक ठोकले. या मोसमात शतक करणारा अय्यर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने कोलकाता नाईट रायडर्सविरूध्द सनरायझर्स हैदराबादसाठी शतक झळकावले होते. (Venkatesh Iyer)

व्यंकटेशने ५१ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ९ षटकार आणि ६ चौकार लगावले. अय्यरचा डाव रिले मेरेडिथने संपुष्टात आणला. १८ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मेरेडिथने त्याला डुआन यानसेनकरवी झेलबाद केले. या मोसमात गुजरात टायटन्सविरुद्ध अय्यरचे शतक हुकले होते. या सामन्यात ८३ धावांवर बाद झाला होता. (Venkatesh Iyer)

कोलकात्याचा आयपीएल शतकाचा दुष्काळ संपला

व्यंकटेश अय्यरने वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावून कोलकात्यासाठी आयपीएलमधील शतकाचा दुष्काळ संपवला. कोलकाताकडून शेवटचे शतक न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने २००८ साली झळकावले होते. मॅक्युलमने आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध १५८ धावांची खेळी खेळली होती. मॅक्‍युलम हा आयपीएलमध्‍ये शतक झळकविणारा पहिला फलंदाज ठरला होता.

कोलकाताविरुद्ध ११ शतके

मॅक्युलमनंतर कोलकाताकडून एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. व्यंकटेशने ही प्रतीक्षा संपवली. तर, आयपीएलमध्ये आत्तापर्यत कोलकाताविरुद्ध आयपीएलमध्ये ११ शतके झळकावली आहेत.

कोलकाताचे मुंबईला १८६ धावांचे आव्हान

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावा केल्या. त्याचवेळी, आंद्रे रसेलने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. मुंबईकडून हृतिक शोकीनने दोन बळी घेतले. त्याचवेळी अर्जुन वगळता इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा :  

Back to top button