MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सचे मुंबई इंडियन्सला १७३ धावांचे आव्हान | पुढारी

MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सचे मुंबई इंडियन्सला १७३ धावांचे आव्हान

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कर्णधार डेव्हिड वॉर्नर (51) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 19.4 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या. हे दोघे वगळता दिल्लीच्या इतर फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीपुढे नांगी टाकली.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या मुंबईने दिल्लीला सुरुवातीपासूनच धक्के दिले. मात्र, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची धावगती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीने पहिल्या पॉवरप्लेच्या 6 षटकांत अर्धशतकी मजल मारली. मात्र, त्यानंतर पीयूष चावला, ऋतिक शौकीन आणि मेरिडेथ यांच्या भेदक मार्‍यासमोर दिल्लीची अवस्था 5 बाद 98 धावा अशी झाली. एका बाजूने दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर एका बाजूने किल्ला लढवत होता. अखेर त्याला अष्टपैलू अक्षर पटेलची साथ लाभली.

अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला 150 च्या पार पोहोचवले. दरम्यान, अक्षरने 22 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, शेवटची दोन षटके राहिली असताना बेहेरनडॉर्फने 54 धावांवर अक्षर पटेलला बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरदेखील 47 चेंडूंत 51 धावा करून बाद झाला. उरलेल्या शेपटाने फारशी वळवळ केली नाही. दिल्लीचा डाव 172 धावांवर आटोपला. पीयूष चावला, बेहेरनडॉर्फने प्रत्येकी तीन, तर रिले मेरिडेथने 2 विकेटस् घेतल्या.

हेही वाचा;

Back to top button