Amit Mishra : अमित मिश्राने केले कोव्हिड नियमाचे उल्लंघन? | पुढारी

Amit Mishra : अमित मिश्राने केले कोव्हिड नियमाचे उल्लंघन?

बंगळूर, वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील अमित मिश्राचा (Amit Mishra) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमुळे बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करू शकते. लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने कोव्हिड-19 शी संबंधित एक महत्त्वाचा नियम मोडला आहे. मिश्रा बॉलवर थुंकी लावताना दिसत आहे. त्याची चूक लगेच कॅमेर्‍यात कैद झाली. अंपायरने इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच षटकात त्याने विराट कोहलीची विकेटही घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फलंदाजीदरम्यान 12 व्या षटकात ही घटना उघडकीस आली. ओव्हर सुरू करण्यापूर्वी अमित मिश्राने (Amit Mishra) बॉलवर थुंकी लावली. थुंकी लावल्याने चेंडूला अतिरिक्त टर्न मिळण्यास मदत होते. याचा फायदा मिश्रालाही सामन्यादरम्यान झाला. त्याच षटकातील तिसर्‍या चेंडूवर त्याने विराट कोहलीला झेलबाद केले. यानंतर चाहते सोशल मीडियावर अमित मिश्राने जे केले ते योग्य होते का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

कोरोना महामारीच्या आगमनानंतर बॉलवर थुंकण्याच्या वापरावर आयसीसीने बंदी घातली होती. हा नियम अजूनही लागू आहे. गोलंदाजाने चुकून बॉलवर थुंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इतर अनेक खेळाडूंनीही ही कामगिरी केली आहे. अमित मिश्राने (Amit Mishra) बॉलवर थुंकल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मिश्राला त्याच्या चुकीबद्दल पंचांनी फटकारले होते. आता सध्यातरी त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. पण बीसीसीआय पुढे जाऊन कोणता कठोर निर्णय घेते का, हे पाहावे लागेल.

Back to top button