IPL 2023 Suyash Sharma | कोण आहे ‘KKR’चा ‘मिस्ट्री स्पिनर’ सुयश शर्मा? ज्याने पदार्पणातच ‘RCB’चा वाजवला बँड | पुढारी

IPL 2023 Suyash Sharma | कोण आहे 'KKR'चा 'मिस्ट्री स्पिनर' सुयश शर्मा? ज्याने पदार्पणातच 'RCB'चा वाजवला बँड

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) गुरुवारी रात्री घरचे मैदान ईडन गार्डन्सवर 81 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) पराभव केला. केकेआरच्या या विजयात शार्दुल ठाकूर यांने अवघ्या 29 चेंडूत 68 धावांची तुफान खेळी केली. त्याचवेळी, या सामन्यात केकेआरच्या युवा फिरकीपटूने (IPL 2023 Suyash Sharma) आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने बंगलोरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सुयश शर्मा असे या १९ वर्षीय युवा गोलंदाजाचे नाव असून त्याने पदार्पणाच्या सामन्यातच ३ बळी घेतले. ही अप्रतिम कामगिरी पाहून अनेक दिग्गज खेळाडू या युवा गोलंदाजाला भारताचा नवा ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणू लागले आहेत.

सुयश शर्माची प्रभावशाली खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 204 धावा केल्या. त्यानंतर सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन या त्रिकुटाने आरसीबीला केवळ 123 धावांत गुंडाळले. सुयश शर्मा (IPL 2023 Suyash Sharma) सामन्यापूर्वी केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, परंतु कर्णधार नितीश राणाने त्याला आरसीबीच्या डावात प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. त्यानंतर सुयशने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 30 धावांत 3 बळी घेतले. दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा यांच्या विकेट्स त्यांने मिळवल्या.

IPL 2023 Suyash Sharma : कोण आहे सुयश शर्मा?

केकेआरने सुयश शर्माला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या टीममध्ये घेतले होते. आयपीएल 2023 मिनी-लिलावात सुयश शर्माला विकत घेतल्यानंतर केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले होते की, आम्ही स्पिनरसाठी अधिक बजेट ठेवले होते. परंतु त्यांना तो फक्त 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर मिळाला. सुयशने दिल्लीच्या अंडर-25 संघात चांगली कामगिरी केली होती. दिल्लीच्या सुयशचा स्पर्धात्मक क्रिकेटमधील हा पहिला टी-२० सामना होता. याआधी तो एकही टी-२० सामना खेळलेला नाही. किंवा लिस्ट ए किंवा फर्स्ट क्लास मॅचही खेळलेला नाही.

“सुयश हा आत्मविश्वास असलेला तरुण आहे आणि त्याचा स्वत:वर विश्वास आहे. त्याने संधीचे सोने केले आणि त्याला अशा प्रकारे गोलंदाजी करताना पाहून खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया KKRचा कर्णधार नितीश राणाने सामन्यानंतर दिली.

हेही वाचा 

Back to top button