IPL 2023 : सनरायजर्स हैदराबाद – लखनौ सुपर जायंट्स आज आमनेसामने

IPL 2023 : सनरायजर्स हैदराबाद – लखनौ सुपर जायंट्स आज आमनेसामने

लखनौ, वृत्तसंस्था : सलामी लढतीत नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागलेल्या सनरायजर्स हैदराबादचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध आयपीएल साखळी (IPL 2023) सामन्यासाठी रणांगणात उतरेल, त्यावेळी नूतन कर्णधार एडन मारक्रमसह काही अव्वल दक्षिण आफ्रिकन खेळाडूंकडून त्यांना विशेष अपेक्षा असणार आहेत.

यापूर्वी मारक्रमच्या गैरहजेरीत भुवनेश्वर कुमारने हैदराबाद संघाचे मागील सामन्यात नेतृत्व भूषवले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीत त्यांना 72 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता मारक्रम व आणखी दोन आफ्रिकन खेळाडू मार्को जॉन्सन व हेन्रिच क्लासेन आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केल्यानंतर आयपीएल संघात परतले असल्याने हा संघ बराच भक्कम झाला आहे.

सनरायजर्स हैदराबादचा संघ यापूर्वी 2021 मध्ये शेवटच्या स्थानी राहिला होता तर गतवर्षी 10 संघांमध्ये त्यांना आठव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यंदा सलामी लढतीत देखील त्यांची बरीच ससेहोलपट झाली. राजस्थानने दोन्ही पॉवर प्ले गाजवताना प्रथम 1 बाद 85 धावांची आतषबाजी केली. नंतर गोलंदाजीत 5 बाद 203 धावांचे संरक्षण करत असताना पहिल्या 6 षटकांत 30 धावांत 2 बळी घेतले होते.
महान फलंदाज ब्रायन लाराचे प्रशिक्षण लाभत असलेल्या सनरायजर्स हैदराबादला वेळीच खेळ उंचावणे आवश्यक असून आजच्या लढतीत त्यांचे हेच मुख्य लक्ष्य असेल. विशेषतः पॉवर प्लेमधील खेळ निर्णायक ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकन खेळाडू वेळीच संघात दाखल झाले असल्याने सनरायजर्स हैदराबाद संघाला बराच दिलासा लाभला आहे.

यापूर्वी टी. नटराजनचा 2-23 अपवाद वगळता अगदी एकही सीमर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांसमोर आव्हान उभे करू शकला नव्हता. अफगाणच्या फझल हक फारुकीने 2 बळी जरूर घेतले. पण, यासाठी त्याला 4 षटकांत 41 धावा मोजाव्या लागल्या. भुवनेश्वर अनुभवी आहे. पण, तोही येथे निष्प्रभ ठरला. उमरान मलिकला 3 षटकांत एका बळीसाठी 32 धावा मोजाव्या लागल्या.

फलंदाजीच्या आघाडीवर मयंक अग्रवाल उत्तम राहिला. मात्र, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी या अन्य दोन भारतीय फलंदाजांना अगदी खातेही उघडता आले नव्हते. यष्टिरक्षक फलंदाज ग्लेन फिलीप्स व हॅरी ब्रुक यांना सूर सापडणे या संघासाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

लखनौसाठी राहुलचा फॉर्म चिंतेचा (IPL 2023)

कर्णधार के.एल. राहुल खराब फॉर्ममध्ये आहे, ही लखनौ संघाची मुख्य चिंता आहे. के.एल. राहुल उत्तम सुरुवात करतो. पण, याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्याच्या निकषावर त्याला सातत्याने अपयश येत राहिले आहे. काईल मेयर्सने मात्र शेवटच्या दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावत आपला फॉर्म अधोरेखित केला आहे. गोलंदाजीत रवी बिश्नोईने आतापर्यंत 5 बळींसह परिणामकारक गोलंदाजी साकारली असून इंग्लिश पेसर मार्क वुडने दिल्लीविरुद्ध सलामी लढतीत डावात 5 बळी घेतले. शिवाय, मागील सामन्यात आणखी 3 बळी वसूल केले होते. मात्र, यादरम्यान लखनौच्या गोलंदाजांचा मारा बराचसा स्वैर स्वरूपाचा देखील ठरत आला असून या निकषावर त्यांना दक्ष राहावे लागेल, असे चित्र आहे.

संभाव्य संघ : (IPL 2023)

सनरायजर्स हैदराबाद : भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, हॅरी ब्रुक, मयांक डगर, फझल हक फारुकी, अकिल होसेन, कार्तिक त्यागी, हेन्रिच क्लासेन, मयांक मार्कंडे, टी. नटराजन, नितीशकुमार रेड्डी, ग्लेन फिलीप्स, आदिल रशिद, सनवीर सिंग, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, विवरांत शर्मा, समर्थ व्यास, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव.

लखनौ सुपर जायंट्स : के.एल. राहुल कर्णधार व यष्टिरक्षक, काईल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), नवीन अल हक, आयुष बदोनी, आवेश खान, करण शर्मा, युद्धवीर चरक, यश ठाकूर, रोमारिओ शेफर्ड, मार्क वुड, स्वप्निल सिंग, मनन वोहरा, डॅनिएल सॅम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, मार्कस स्टायनिस, रवी बिश्नोई, मयांक यादव.

logo
Pudhari News
pudhari.news