IPL 2023 Virat Kohli: धोनीच्या शैलीत कोहलीचा विजयी षटकार; ‘वर्ल्डकप 2011’ च्या फायनलची आठवण | पुढारी

IPL 2023 Virat Kohli: धोनीच्या शैलीत कोहलीचा विजयी षटकार; 'वर्ल्डकप 2011' च्या फायनलची आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी करून संघाला पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवून (IPL  2023 Virat Kohli) दिला. तर कर्णधार फाफ डुप्लेसीने 73 धावा करून कोहलीसोबत 148 धावांची भागीदारी केली. दरम्यान, कोहलीने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

12 वर्षांपूर्वी विश्वचषक 2011 मधील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जसा षटकार मारला होता. त्याच पद्धतीने विराटने षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केला. कोहलीचा षटकार पाहून चाहत्यांना धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकाराची आठवण झाली. कोहलीच्या या पराक्रमाबद्दल चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत.

या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना कोहली (IPL 2023 Virat Kohli) म्हणाला की, हा अभूतपूर्व विजय आहे. अनेक वर्षांनी आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळलो. आज आम्ही ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मुंबईने पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. या दोघांशिवाय, आम्ही जास्तीत जास्त वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलो, यावरून आमच्या कामगिरीत सातत्य असल्याचे दिसून येते. आम्हाला आमचे लक्ष कायम राखावे लागेल आणि संतुलित संघासह मैदानात उतरावे लागेल. ही लय पुढे चालू ठेवायची आहे. आम्हाला आमची रणनीती अधिक चांगल्या पद्धतीने राबवायची आहे.

दरम्यान, 2011 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना श्रीलंकेशी झाला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावत 274 धावा केल्या. त्यानंतर भारताने हा ऐतिहासिक सामना 4 विकेट गमावून जिंकला. भारताकडून धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली. तर गौतम गंभीरने 97 धावा केल्या होत्या. त्यावेळी विराट कोहलीने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा 

Back to top button