Swiss Open : स्वीस ओपनमध्‍ये भारताचा डंका : सात्विक-चिराग चॅम्पियन; पुरुष दुहेरीमध्‍ये चीनच्‍या जोडीचा पराभव | पुढारी

Swiss Open : स्वीस ओपनमध्‍ये भारताचा डंका : सात्विक-चिराग चॅम्पियन; पुरुष दुहेरीमध्‍ये चीनच्‍या जोडीचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॅडमिंटनमधील प्रतिष्‍ठेची स्‍वीस ओपन स्‍पर्धेत आज ( दि. २६ ) भारतीय खेळाडूंनी कमाल केली. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने स्विस या स्‍पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने चीनच्‍या तांग कियान आणि रेन यू शियांग या जोडीचा २१-१९ आणि २४-२२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. ( Swiss Open )

स्वीस ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडी सुरुवातीपासूनच प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. सात्विक-चिराग यांनी पहिला गेम २१-१९ अशा फरकाने जिंकला, परंतु दुसऱ्या गेममध्ये दोन जोड्यांमधली चुरशीची लढत पाहायला मिळाली. तथापि, भारतीय जोडीने अखेरीस २४-२२ अशा फरकाने गेम जिंकून विजेतेपदवर आपली मोहर उमटवली.

भारताच्या अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीने यापूर्वी ओंग येव सिन आणि तेओ ई यी या मलेशियन जोडीचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.  तर सात्विक-चिराग जोडीने उपांत्‍य फेरीत ५४ मिनिटे रंगलेल्या सामन्‍यात जेप्पे बे आणि लासे मोल्हेडे या डॅनिश जोडीचा 15-21, 21-11, 21-14 असा पराभव केला होता. त्याचवेळी उपांत्यपूर्व फेरीतही सात्विक-चिराग यांनी 84 मिनिटे चुरशीचा सामन्‍यात विजय मिळवला होता.

Swiss Open : दिग्‍गज खेळाडू स्‍पर्धेतून बाहेर

स्वीस ओपन सुपर सीरिज स्पर्धेत भारताचे दिग्‍गज खेळाडू आधीच बाहेर पडले होते. महिला एकेरीत पीव्ही सिंधू आणि पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, मिथुन मंजुनाथ पराभूत झाले होते. अशा परिस्थितीतही सात्विक-चिराग जोडीने उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन करत दुहेरी भारताचा दबदबा कायम राखत चीनी जोडीला पराभूत केले.

सात्‍विक -चिराग जोडीचे पाचवे जागतिक विजेतेपद

सात्विक आणि चिराग यांचा गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील पराभवावर झाला होता. २०१९ मधील थायलंड ओपन आणि २०१८ मधील हैदराबाद ओपन तसेच गेल्या वर्षी इंडिया ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकलेल्या सात्विक-चिराग जोडीचे हे कारकिर्दीतील पाचवे जागतिक विजेतेपद आहे. सात्विक आणि चिरागने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा : 

 

 

 

 

 

Back to top button