IPL 2023 : विजेतेपदाचा ‘षटकार’ ठोकण्यास मुंबई इंडियन्स सज्ज | पुढारी

IPL 2023 : विजेतेपदाचा ‘षटकार’ ठोकण्यास मुंबई इंडियन्स सज्ज

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये एखादा संघ विजयाचा प्रबळ दावेदार असेल तर तो मुंबई इंडियन्स. सर्वाधिक 5 वेळा ही लीग जिंकणार्‍या मुंबईसाठी 2022 चा सिझन मात्र एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी असलेला मुंबईचा संघ पूर्ण लीगमध्ये केवळ 4 सामने जिंकू शकला आणि गुणतालिकेत शेवटचे स्थान मिळाले. (IPL 2023) रोहित शर्माच्या संघाने खराब गोलंदाजी आणि फलंदाजीने मुंबईकरांना लुटले. आता नव्या सीझनमध्ये संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे. मुंबई 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. नव्या-जुन्या खेळाडूंच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघ विजेतेपदाचा षटकार मारण्यास सज्ज झाला आहे. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सची बलस्थाने आणि कमजोर बाजू कोणत्या आहेत, त्या पाहूया. (IPL 2023)

फलंदाजी बळकट (IPL 2023)

मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव असे भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. टीम डेव्हिड हा मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज आहे. लिलावात फ्रँचायझीने कॅमेरून ग्रीनला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हॉल्ड ब्रेविस हे दक्षिण आफ्रिकेचे दोन युवा फलंदाज आहेत. अशा स्थितीत संघाची फलंदाजी बाजू खूपच भक्कम दिसत आहे.

गोलंदाजीत संघाकडे जोफ्रा आर्चरसारखे मोठे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. फिरकीमध्ये, फ्रँचायझीने अनुभवी पीयुष चावलाला संघात घेतले आहे. जेसन बेहरेनडॉर्फही मुंबईकडून खेळताना दिसेल. (IPL 2023)

बुमराह, रिचर्डसनची अनुपस्थिती जाणवेल

गोलंदाजीमध्ये मुंबईची बाजू कागदावर तरी कमजोर दिसत आहे. जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचे झाय रिचर्डसन आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. बुमराहच्या अनुपस्थितीत संघाकडे कोणताही अनुभवी देशांतर्गत वेगवान गोलंदाज नाही. फ्रँचायझीने त्याच्या बदलीची घोषणाही अद्याप केलेली नाही. फिरकीतही चावलाशिवाय परदेशी संघांना दडपण आणेल असे दुसरे नाव नाही.

मुंबई इंडियन्सची पलटण

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, पीयुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, डने जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, राघव गोयल, र्‍हाय रिचर्डसन, आकाश मधवाल.

तरुण चेहर्‍यांकडून अपेक्षा

मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक तरुण चेहरे आहेत, जे आपल्या खेळीने सर्वांना आश्चर्याचे धक्के देऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते शम्स मुल्लानी. मुल्लानी हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे; परंतु अद्याप त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. तो संघासाठी सामना जिंकणारा अष्टपैलू खेळाडू ठरू शकतो. याशिवाय तिलक वर्माने गेल्या आयपीएलमधील आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. अर्शद खान हा मुंबई संघातील एक असा खेळाडू आहे, ज्याचे नाव फार कमी लोकांना माहीत असेल, पण तो गेमचेंजर ठरू शकतो. तो बॉल आणि बॅट दोन्हीने चमत्कार करू शकतो.

अधिक वाचा :

Back to top button