Imran Nazir : पराभवाच्या भीतीने भारत पाकमध्ये येत नाही; इम्रान नजीरने तोडले अकलेचे तारे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमिझ राजा यांनी भारतात होणार्या वन-डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू इम्रान नझीरने भारतावर निशाणा साधला आहे. (Imran Nazir)
पाकिस्तानचा माजी सलामीवीर इम्रान नझीरने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात त्याने एक दावा केला आहे. खरे तर पराभवाच्या भीतीमुळे भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात येत नसल्याचे नझीरने म्हटले आहे. पाकिस्तानात आपला पराभव होईल, या भीतीने भारतीय संघ पळ काढत असल्याचा दावा त्याने केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला भेट न देण्याचे कारण देणे हे केवळ ‘निमित्त’ असल्याचे नझीरचे म्हणणे आहे. बर्याच दिवसांपासून अनेक देशांनी पाकिस्तानला भेट दिली आहे, अशा स्थितीत टीम इंडिया फक्त बहाणा करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. (Imran Nazir)
सुरक्षा हे फक्त एक निमित्त आहे ः नझीर
नादिर अली पॉडकास्टवर बोलताना नझीरने म्हटले, सुरक्षेचे कोणतेही कारण नाही. आतापर्यंत किती संघ पाकिस्तानात आले आहेत ते पाहा. अगदी ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानचा दौरा केला आहे. हे सर्व फक्त झाकून ठेवले आहे, पण भारत पाकिस्तानात येणार नाही कारण त्यांना हरण्याची भीती आहे. सुरक्षा हे फक्त एक निमित्त आहे. या आणि क्रिकेट खेळा. तुम्ही राजकारण करायला लागला तर मार्ग कसा निघेल.
तसेच लोकांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायचा आहे. कारण त्यात एक वेगळाच उत्साह असतो. संपूर्ण जगाला हे माहीत आहे. क्रिकेटला जगाच्या कानाकोपर्यात नेण्यासाठी भारत-पाकिस्तान सामना आवश्यक आहे, असे आम्हा क्रिकेटपटूंनाही वाटते. आम्ही खूप क्रिकेट खेळायचो. भारत हा एक मोठा संघ आहे, पण त्यांना पाकिस्तानकडून हरणे परवडणारे नाही. हा एक खेळ आहे, हार-जीत होतच असते, असे इम्रान नझीरने आणखी सांगितले.
अधिक वाचा :
- Asia Cup 2023 : स्पर्धा पाकिस्तानात; भारताचे सामने तटस्थ देशात; आशिया चषकाचा तोडगा द़ृष्टिक्षेपात
- Team India : नंबर-४ चे कोडे कसे सुटणार? वन-डे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया अडचणीत
- Women Maharashtra Kesari Sangli | सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी