MI vs UP : मुंबई इंडियन्सची अंतिम सामन्यात धडक | पुढारी

MI vs UP : मुंबई इंडियन्सची अंतिम सामन्यात धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्ले ऑफ सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. त्यांनी ७२ धावांनी सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी मुंबईचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना दि. २६ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (MI vs UP)

नताली स्कायव्हर ब्रंटच्या नाबाद ७२ धावा आणि इस्सी वोंगच्या हॅट्ट्रिकमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला. इस्‍सी वाँगने चार षटकांत १५ धावा देत चार बळी घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक केली. (MI vs UP)

यूपीकडून किरण नवगिरेने झुंज दिली. २७ चेंडूत ४३ धावा करून ती बाद झाली. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा १६, ग्रेस हॅरिस १४ आणि अॅलिसा हेली ११ धावा करून बाद झाल्या. यूपीच्या ११ फलंदाजांपैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मुंबईकडून इस्‍सी वोंग व्यतिरिक्त सायका इशाकने दोन बळी घेतले. नताली सीव्हर, हेली मॅथ्यूज आणि जय कलिता यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा;

Back to top button