कोल्‍हापूर : मूरगुड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या गाडीचा अपघात | पुढारी

कोल्‍हापूर : मूरगुड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या गाडीचा अपघात

सिद्धनेर्ली ,पुढारी वृतसेवा :  कागल मुरगुड रोड वर पिंपळगाव खुर्द ता कागल नजीक मूरगुड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये दोन्ही कारच्या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका कारमधील चालकास किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबात मिळालेल्‍या माहितीनुसार, कागल मुरगुड रस्त्यावर पिंपळगाव खुर्दच्या दरम्यान मुरगूड कडून येणारी व कागल कडून येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास झाला. पिंपळगाव खुर्द येथे राहणारे विठ्ठल वाडकर हे कागलहून पिंपळगावच्या दिशेने आपल्या मुलासह गाडी मधून जात होते. तर मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप शंकरराव घारगे हे एकटेच स्वतः कार (गाडी नंबर MH 01 AL 5700) मुरगुडहून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरकडे जात होते.

मुरगुड नाका ते पिंपळगाव खुर्दच्या दरम्यान दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. वाडकर यांची कार रस्त्यावरच फिरली तर मुख्याधिकारी घारगे यांची कार रस्त्याकडेच्या चरीमध्ये जाऊन थांबली. यामध्ये विठ्ठल वाडकर यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुख्याधिकारी घारगे यांना सुदैवाने कोणतीही दुखापत न झाल्याने ते या मोठ्या अपघातात बचावले. या अपघाताची महिती समजताच कागलचे मुख्याधिकारी श्रीराम पवार तसेच आरोग्य अधिकारी नितीन कांबळे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले.

Back to top button