पुढारी ऑनलाईन: ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क रोज नवनवे निर्णय घेत आहेत. काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी सर्व फ्री ब्लू टिकर भ्रष्ट असल्याचे सांगितले होते. मालक झाल्यानंतर लागलीच एलॉन मस्कने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केले, जी फी आधारित सेवा आहे. ट्विटर ब्लूची सेवा घेणाऱ्या युजर्सना मोठ्या पोस्ट टाकण्याची सुविधा मिळते. या शिवाय ब्लू टिक मिळते आणि ट्विट एडिट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आता एलॉन मस्क फ्री ब्लू टिक काढणार आहे.
ब्लू टिक खात्याला legacy verified टॅग आधीपासूनच आहे, ते एलॉन मस्क पुढील आठवड्यापासून काढून टाकणार आहेत. म्हणजेच, सर्व legacy verified खात्यांचे ब्लू टिक काढून टाकले जाईल. जर फ्री ब्लू टिक्स असलेल्या यूझरने ट्विटर ब्लूची सेवा विकत घेतल्यास ब्लू टिक राहील, परंतु लिगली व्हेरिफाइड केलेला टॅग काढून टाकला जाईल. हे बदल 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत. legacy verified अंतर्गत पत्रकार, मीडिया हाऊस, सेलिब्रिटी इत्यादींना ब्लू टिक्स मोफत देण्यात आले आहेत.
Twitter ब्लूच्या मोबाईल प्लॅनची किंमत भारतात 900 रुपये आहे आणि वेब आवृत्तीसाठी 650 रुपये आकारले जातात. एलॉन मस्क यांनी अलीकडेच फ्री अकॉउंटसमधून एसएमएस आधारित टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) फिचर काढून टाकले आहे. आता एकंदरीत असे आहे की, जर तुम्हाला तुमच्या ट्विटर खात्यासाठी ब्लू टिक हवी असेल आणि चांगल्या सुरक्षिततेसाठी 2FA सेवा हवी असेल, तर तुम्हाला दरमहा किमान 650 रुपये भरावे लागतील. अन्यथा तुमच्या खात्याची SMS आधारित 2FA सेवा बंद केली जाईल आणि ब्लू टिकही काढून टाकली जाईल.