1st Women Maharashtra Kesari : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सांगलीत सुरुवात | पुढारी

1st Women Maharashtra Kesari : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सांगलीत सुरुवात

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी सुरू झाली. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 450 कुस्तीगीर सहभागी झाले आहेत. आज शुक्रवारी मुख्य लढत होणार आहे. (1st Women Maharashtra Kesari)

हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिली स्पर्धा 50 वजन गटामध्ये झाली. पहिली कुस्ती रायगडच्या भूमिका खंडा आणि नागपूरच्या रूपाली मातवडकर या दोघींमध्ये झाली. या कुस्तीमध्ये भूमिका हिला शून्य गुण मिळाले, तर रूपाली हिला सात गुण मिळाले. त्यामुळे या कुस्तीत रूपाली ही विजयी झाली. दुसरी कुस्ती अहमदनगरच्या दुर्गा शिरसाट व सातार्‍याच्या श्रेया मंडले यांच्यामध्ये झाली. यामध्ये दुर्गा हिला शून्य गुण मिळाले, तर मंडले हिला बारा गुण मिळाले. त्यामुळे या कुस्तीमध्ये श्रेया ही विजयी झाली. (1st Women Maharashtra Kesari)

यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, बाळासाहेब लांडगे, संभाजी वरुटे, क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे, मालन मोहिते, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नवनाथ ढमाळ, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गीता सुतार उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button