सोलापूर : गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : गुंगीचे औषध मिसळलेले ज्यूस पाजून भाजी विक्रेत्या महिलेवर अत्याचार केला. त्यावेळी काढलेले फोटो पतीला दाखविण्याची धमकी देऊन लाख रुपये उकळणाऱ्या रिक्षा चालकाविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुनिल उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे (वय ३५, रा. भारत माता नगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. पीडितेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. एक वर्षापूर्वी पीडितेच्या पतीने घरगुती काम, भाजी पाला आणणे तसेच हॉस्पीटलमध्ये जाण्याकरीता आरोपीची रिक्षा भाड्याने लावली होती. यातूनच आरोपीबरोबर पीडितेची चांगली ओळख झाली. ओळखीतून झालेल्या मैत्रिमुळे पीडिता आणि रिक्षा चालक यांच्यात फोनवरून सतत बोलणे होत होते. एप्रिल २०२२ मध्ये प्रकृती बिघडल्याने पीडिता आरोपीच्या रिक्षातून रुग्णालयात गेली होती. तेथून परतत असताना, रिक्षा चालक सुनीलने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळून पीडितेला पिण्यास दिले होते.

ज्यूस पिल्यानंतर पीडितेला गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर रिक्षा चालक सुनीलने अक्कलकोट रस्त्यावरील लॉजमध्ये नेऊन पीडितेवर अत्याचार केला. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढले होते. ते फोटो पतीला दाखविण्याची भीती घालून रिक्षा चालक पीडितेला ब्लॅकमेल करत होता. यातूनच त्याने पीडितेकडून जवळपास एक लाख रुपये उकळले. तसेच तुझ्या पतीला मारतो, नाहीतर रेल्वेच्या आडवे पडून स्वत: जीव देण्याची धमकी देऊन आरोपी सुनीलने पीडितेवर जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केला. आरोपीकडून होणारा त्रास सहन होत नसल्याने पीडितेने पतीला घडला प्रकार सांगून पोलिसात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सपोनि गायकवाड करत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button