WPL 2023 : वुमन्स प्रिमियर लीगमध्ये यूपीने रोखला मुंबईचा विजयी रथ | पुढारी

WPL 2023 : वुमन्स प्रिमियर लीगमध्ये यूपीने रोखला मुंबईचा विजयी रथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगच्या यूपी विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पहिला पराभव झाला. रोमहर्षक सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने 19.3 षटकांत पाच गडी गमावून सामन्यात विजय मिळवला. मुंबईने लीग सामन्यांमध्ये सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर आजच्या सामन्यात पहिलाच पराभव झाला. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. (WPL 2023)

यूपीला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 13 धावा करायच्या होत्या. त्यानंतर सोफी एक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा क्रीजवर होत्या. हेली मॅथ्यूजने 19व्या षटकात गोलंदाजी करत आठ धावा दिल्या. यानंतर यूपीला विजयासाठी शेवटच्या षटकात पाच धावांची गरज होती. इस्सी वाँगने पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. सोफी एक्लेस्टोनने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत यूपी संघाला विजय मिळवून दिला.
यूपीचा सहा सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. (WPL 2023)

यूपीचा संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यूपीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मुंबई 10 गुणांसह अव्वल तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूपी संघाचा सामना 20 मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि 21 मार्च रोजी शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी होईल. तर मुंबईला 20 मार्चला दिल्ली आणि 21 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करायचा आहे.

हेही वाचा;

Back to top button