संभाजीनगर : विहिरीत काम करताना डोक्यात दगड पडून मजुरांचा मृत्यू | पुढारी

संभाजीनगर : विहिरीत काम करताना डोक्यात दगड पडून मजुरांचा मृत्यू

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यात विहिरीत काम करत असताना डोक्यात दगड पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना अनाड शिवारातील शेतात काम सुरू आलेल्या विहिरीत घडली.

घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमी व मृत मजुराला अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजी दामोधर हातोळे (वय ४५ वर्ष रा.मोहाळ ता. सिल्लोड) असे या घटनेत मरण पावलेल्या मजुराचे नाव आहे. अनाड शिवारातील गजानन गदई यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. शुक्रवारी (दि. १७) जोरदार पाऊस झाल्याने विहिरीच्या बाजूच्या कड्यावरील दगड डोक्यात पडल्याने ही दुदैवी घटना घडली.

अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे,उपनिरीक्षक राजू राठोड, पोहेकॉ विकास चौधरी,अरुण गाडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास बीट जमादार अरुण गाडेकर करीत आहे.

Back to top button