IND vs AUS ODI: श्रेयसच्या अनुपस्थितीत सूर्याला संधी! पण इशान किशन राहिल राखीव सलामीवीर? | पुढारी

IND vs AUS ODI: श्रेयसच्या अनुपस्थितीत सूर्याला संधी! पण इशान किशन राहिल राखीव सलामीवीर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवार (दि.17)पासून तीन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. दरम्यान, या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणा-या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची बनली आहे.

श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत न खेळलेले रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी संघात पुनरागमन केले आहे. तर श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत वेगवेगळ्या दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत, ज्यांची पुनरागमनाची कोणतीही तारीख अद्याप निश्चित नाही.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम संधी?

श्रेयस अय्यरने अलिकडच्या वर्षांत चौथ्या क्रमांकावर उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याने मागील 20 वनडे सामन्यांमध्ये 47.35 च्या सरासरीने दोन शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 805 धावा केल्या आहेत. मात्र, यादरम्यान त्याला दुखापतींचाही मोठा फटका बसला आहे. पाठदुखीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला होता आणि आता याच समस्येमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.

श्रेयसची अनुपस्थिती त्याचा सहकारी मुंबईकर सूर्यकुमार यादवसाठी मोठी संधी असू शकते. तो न्यूझीलंडविरुद्धच्या दोन वनडे सामन्यांचा भाग होता आणि त्याने 31 आणि 14 धावा केल्या. मात्र, त्याला वनडेमध्ये टी-20 फॉर्म राखता आला नाही. 50 षटकांच्या क्रिकेटच्या 18 डावांमध्ये सूर्यकुमारची सरासरी केवळ 28.86 आहे आणि त्याच्या नावावर फक्त दोन अर्धशतके आहेत. त्यामुळे सूर्यकुमारसाठी कांगारूंविरुद्धया तीन वनडे खूप महत्त्वाच्या ठरू शकतात.

इशान किशन राखीव सलामीवीर?

मधल्या फळीतील स्थानासाठी सूर्याची इशान किशन आणि राहुलसोबत चुरस असू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ईशान मधल्या फळीत खेळला, पण तो धावा काढण्यात अपयशी ठरला.

मागिल वर्षी बांगलादेश विरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर इशान हा कर्णधार रोहित शर्माच्या साथीने भारताचा सलामीवीर पर्याय असल्याचे दिसत होते. तशी चर्चाही रंगली. परंतु, शुभमन गिलने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. गिलने मागील सहा वनडे डावांमध्ये 70, 21, 116, 208, 40* आणि 112 धावा केल्या आहेत.

पहिल्या वनडेत रोहितच्या अनुपस्थितीमुळे इशान शुभमनसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. पण रोहितच्या पुनरागमनानंतर कदाचित तो संघाचा राखीव सलामीवीर राहील. याचे कारण ईशानचा अलीकडचा फॉर्म देखील असू शकतो. चितगावमध्ये द्विशतक झळकावल्यानंतर त्याने नऊ डावांमध्ये केवळ 37 धावांची सर्वोत्तम धावसंख्या केली आहे. डावखुरा फलंदाज हिच काय तेवढी किशनची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्याच्याकडे शिखर धवन आणि पंत यांच्या अनुपस्थिती डावखुरा फलंदाज म्हणून टॉप ऑर्डरचा पर्याय बघतले जात आहे.

राहुल-पंतच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंगचा पहिला पर्याय कोण?

पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलने 16 एकदिवसीय डावांमध्ये 50 च्या वर सरासरी आणि 100 च्या वर स्ट्राईक रेटने 658 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील स्थान गमावल्यानंतर वनडेमध्ये जागा राखण्याची राहुलला शेवटची संधी असू शकते.

अष्टपैलू कोण असणार?

भारताकडे सध्या उपकर्णधार हार्दिक पंड्या, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांच्यासह पाच अष्टपैलू पर्याय आहेत. भारताने यापैकी दोन फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजीचा अष्टपैलू पर्याय घेतल्यास एकूण तीन विशेषज्ञ गोलंदाज खेळवले जाऊ शकतात. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांच्यात काय समतोल साधला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकच फिरकीपटू संघात स्थान मिळवू शकेल. तर वेगवान विभागात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांच्यात स्पर्धा आहे.

Back to top button