David Warner DC Captain : डेव्हीड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार | पुढारी

David Warner DC Captain : डेव्हीड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner DC Captain : दिल्ली कॅपिटल्सचा हंगामी कर्णधार पदी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उपकर्णधर म्हणून अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. फ्रँचायझीने गुरुवारी ट्विटरवरून याची घोषणा केली. अगामी आयपीएल 31 मार्चपासून सुरू होणार आहे. 1 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध होणार आहे.

दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागी संघाचे नेतृत्व करण्यासाठी वॉर्नर हाच योग्य व्यक्ती असल्याचे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि संघ व्यवस्थापनातील इतरांनी व्यक्त केले होते. अनेक क्रिकेट तज्ञांनीही वॉर्नर हाच दिल्लीचा कर्णधार होईल असा अंदज वर्तवला होता, अखेर त्यावर फ्रँचायझीने शिक्कामोर्तब केला.

दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत डिसेंबरमध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तथापि, या पदासाठी अक्षर पटेल हा प्रमुख दावेदार होता, जो गेल्या मोसमात संघाचा उपकर्णधार देखील होता. मात्र, त्याला या हंगामातही उपकर्णधार पदी कायम ठेवून वॉर्नरच्या खांद्यांवर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वॉर्नरची आयपीएल कारकिर्दी

वॉर्नरने 2009 मध्ये दिल्ली संघातूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2014 मध्ये, त्याला सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीने विकत घेतले. यानंतर त्याला कर्णधारही करण्यात आले. फेब्रुवारी 2022 मध्ये, आयपीएल 2023 च्या लिलावात या ऑस्ट्रेलियन सलामीवीराला डीसीने पुन्हा एकदा आपल्या संघात सामील करून घेतले. या 36 वर्षीय अनुभवी फलंदाजासाठी फ्रँचायझीने 6.25 कोटी रुपये मोजले होते.

वॉर्नरला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. याचा दिल्लीला सर्वात मोठा फायदा होईल. 2015 मध्ये तो हैदराबादचा कर्णधार झाला. याच मोसमात त्याने आपल्या आक्रमक कर्णधाराची छाप पाडली. 2016 च्या मोसमात त्याने कर्णधारपद सिद्ध करत हैदराबादला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. वॉर्नरने आतापर्यंत एकूण 69 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्यापैकी 35 सामने जिंकले आहेत असून 32 सामने गमावले आहेत. तर दोन सामने बरोबरीत राहिले.

वॉर्नरची आयपीएलमधील आकडेवारी

डावखुरा फलंदाज वॉर्नरने 13 वर्षात आयपीएलमध्ये एकूण 162 सामने खेळले आहेत. जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट लीगमध्ये त्याने 42.00 च्या सरासरीने आणि 140.69 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 5,881 धावा फटकावल्या आहेत. त्याने या लीगमध्ये सर्वाधिक 126 धावांसह 4 शतके आणि 55 अर्धशतकेही तडकावली आहेत. वॉर्नरने आतापर्यंत 22 वेळा नाबाद असताना लीगमध्ये 577 चौकार आणि 216 षटकार मारले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ :

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल (उप कर्णधार), अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिले रुसो , मनीष पांडे, एनरिक नोरखिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि फिल सॉल्ट.

Back to top button