Virat Kohli : विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम! | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अगामी तीन वनडेमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) शतक झळकावण्याची मोठी संधी असून त्याच्या निशाण्यावर सचिन तेंडूलकरचा एक मोठा विक्रम आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ शतके झळकावली आहेत. तर सचिन तेंडुलकर एका शतकाने त्याच्या पुढे आहे. मास्टर ब्लास्टरने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये कांगारूंविरुद्ध नऊ शतके ठोकली असून त्याचा हा विक्रम विराट नक्कीच मोडेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

कोहलीने मायदेशात 107 वनडे सामने खेळले आहेत ज्यात त्याने 21 शतकांसह 58.87 च्या सरासरीने 5358 धावा केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 59.95 च्या सरासरीने 23 सामन्यांत पाच शतकांसह 1199 धावा फटकावल्या आहेत.

कांगारूंविरुद्धच्या वनडे सामन्यातील विराट कोहलीची आकडेवारी नेत्रदीपक आहे. कोहलीने श्रीलंका वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरुद्ध वनडेमध्ये 2000 हून अधिक धावा तडकावल्या आहेत. कांगारूंविरुद्ध कोहलीने 43 सामन्यांत 54.81 च्या सरासरीने 2083 धावा केल्या आहेत, तर त्याची कारकिर्दीतील सरासरी 57.69 आहे.

ICC Rankings Virat Kohli: विराटची आयसीसी टेस्ट क्रमवारीत झेप, गोलंदाजीत अश्विन अव्वल स्थानी कायम

कोहलीला रोखण्यासाठी स्टीव्ह स्मिथच्या संघाला आगामी मालिकेसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. कोहलीने गेल्या वर्षी चट्टोग्राममध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे शतक झळकावून तब्बल तीन वर्षांनंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीची कामगिरी अप्रतिम झाली होती. त्याने तीन सामन्यांमध्ये 141.50 च्या सरासरीने नाबाद 166 धावा करत 283 धावा केल्या.

कोहली न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप

श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळली. या मालिकेत 34 वर्षीय कोहली तेंडुलकरचा घरच्या मैदानावरील सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रमही मोडेल अशी अपेक्षा होती. कोहलीने मायदेशात 21 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडू निराशा झाली. तो केवळ 18.33 च्या सरासरीने 55 धावा करू शकला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम कसोटीत कोहलीने 186 धावा केल्या आहेत. नोव्हेंबर 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत जवळपास तीन वर्षे तो एकही शतक झळकावू शकला नाही, परंतु गेल्या सहा महिन्यांत त्याने चार शतके झळकावली आहेत.

कोहलीला रोखण्याची जबाबदारी अॅडम झाम्पावर

मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, कोहलीला रोखण्याची जबाबदारी अॅडम झाम्पावर असेल. झम्पाने कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या 16 डावांमध्ये पाच वेळा आणि टी-20 मध्ये तीनदा बाद केले आहे. त्यामुळे कोहली क्रीझवर येताच स्टीव्ह स्मिथने गोलंदाजीची धुरा अॅडम झाम्पाकडे दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 

Back to top button