ICC Test Rankings : कसोटी मालिका जिंकूनही टीम इंडियाचे मोठे नुकसान! | पुढारी

ICC Test Rankings : कसोटी मालिका जिंकूनही टीम इंडियाचे मोठे नुकसान!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Rankings : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले, मात्र नंतर त्यांना विजय मिळवता आला नाही. तिसरा सामना ऑस्ट्रेलियन संघाने पुनरागमन करत जिंकला आणि शेवटचा सामना अनिर्णित राहिला. तरीही टीम इंडियाने मालिका 2-1 अशी खिशात घातली. मात्र, बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरी कसोटी गमावल्याने आणि अहमदाबादमध्ये खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेवटचा सामना पाच दिवस चालला, पण शेवटच्या तासात निकाल लागणार नाही असे वाटत असताना पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना अनिर्णीत संपवला. या मालिकेतील चारही सामने संपल्यानंतर आता आयसीसीने नवे मानांकन जाहीर केले आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असला तरी टीम इंडियाला फारसा फायदा होऊ शकलेला नाही. एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आणि एक सामना ड्रॉ राहिल्याने भारतीय संघाचे समीकरण बिघडले आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर 1

आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे. भारताविरुद्ध दोन सामने गमावूनही त्यांनी कांगारू संघाचे रेटिंग अजूनही 122 आहे आणि टीम इंडिया 119 च्या रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूर येथील तिसरी कसोटी जिंकून भारत अव्वल स्थान पटकावेल, अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाने हा सामना नऊ विकेटने गमावला. आशा अजूनही शिल्लक होती. अखेरच्या अहमदाबाद कसोटीत रोहित सेनेने विजय मिळवला असता तरी भारतीय संघ पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला असता, मात्र इथेही निराशा हाती आली. अखेरचा सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे टीम इंडियाने मालिका काबीज केली खरी, पण नंबर वन कसोटी संघ होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

अहमदाबाद कसोटी ड्रॉ राहिली, त्याचवेळी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. याचा टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला आणि संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुस-यांदा धडक मारली. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाने इंदूर कसोटी जिंकून डब्ल्यूटीसीची अंतिम फेरीत गाठली होती.

आता डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकला तर एकाचवेळी दोन यश पदरी पडतील. सर्वप्रथम, आयसीसी ट्रॉफीचा पडलेला दुष्काळ संपेल, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून कसोटीत नंबर वन संघ बनण्याची संधी मिळेल.

Back to top button