Ind vs Aus 4th Test : अहमदाबाद कसोटीत रोहितला सुधाराव्या लागतील ‘या’ मोठ्या चुका! | पुढारी

Ind vs Aus 4th Test : अहमदाबाद कसोटीत रोहितला सुधाराव्या लागतील ‘या’ मोठ्या चुका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ind vs Aus 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता टीम इंडियाला चौथी कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र व्हायचं आहे, पण या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला अनेक चुका सुधाराव्या लागतील.

फलंदाजांचे सामूहिक अपयश

भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी न करणे हा आता ट्रेंड बनत चालला आहे का? असा सवाल चाहत्यांमधून उपस्थित होत आहे. कर्णधार रोहित शर्माची बॅट नागपुरातील पहिला डाव वगळता संपूर्ण मालिकेत शांत राहिली. फॉर्मात नसलेल्या केएल राहुलच्या जागी आलेल्या शुभमन गिललाही इंदूरमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजाराच्या नावावर या मालिकेत केवळ एक अर्धशतक आहे, तर विराट कोहलीला धावा काढण्यासाठी धडपड करावी लागत आहे. हे फलंदाजांचे सामूहिक अपयश आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये खालच्या फळीतील फलंदाजांनी ही उणीव आपल्या चमकदार कामगिरीने लपवून ठेवली. आता अहमदाबाद कसोटी जिंकारची असेल, तर भारताच्या आघाडी फळीतीय फलंदाजांना आपली ताकद दाखवावी लागेल. (ind vs aus 4th test ahmedabad test)

दर्जेदार खेळपट्टी तयार करा

नागपूर आणि दिल्ली कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी पाहुण्या ऑट्रेलियाला आपल्या वळणदार गोलंदाजीच्या जोरावर नाचवले. इंदूर कसोटीत असेच यश मिळेल या अपेक्षेने होळकर मैदानावरील खेळपट्टी अशी बनवली की येथे पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रापासूनच चेंडू स्पिन वळू लागला. याचा फायदा कांगारूंच्या नॅथन लायन, कुहनमन, मर्फी या फिरकी त्रिकुटाने घेतला आणि पहिल्याच दिवशी टीम इंडियाला अवघ्या 109 धावांत गारद केले. याचाच अर्थ टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. खेळपट्टीवर बॅट आणि बॉल यांच्यात खरोखरच समतोल दिसला नाही. सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘खराब’ रेटींग देऊन तीन डिमेरिट गुण दिले. त्यामुळे अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीसाठी भारताला उपयुक्त आणि दर्जेदार खेळपट्टी तयार करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. (ind vs aus 4th test ahmedabad test)

डीआरएस घेण्यात सावधगीरी बाळगावी लागेल

आजकाल सामना जिंकण्यात किंवा हरण्यात डीआरएस महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, इंदूर कसोटीत रोहितने डीआरएस घेण्याबाबत अनेक चुका केल्या. जेथे गरज नव्हती तिथे भारताने डीआरएस घेतले, जे तिस-या पंचांनीही परतवून लावले. सामना गमावण्याचे हे एक प्रमुख कारण असल्याचे अनेकांनी विश्लेषण केले. अशा स्थितीत रिव्ह्यू कधी घ्यायचा हे कर्णधाराचे कौशल्य आहे. रिव्ह्यू वाया जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी भारतीय संघाला यात नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल.

गोलंदाजांचा योग्य वापर

अहमदाबादची खेळपट्टी नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माला खूप विचारपूर्वक गोलंदाजीत बदल करावे लागतील. इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात रोहितने अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नाही. अहमदाबादमध्ये भारतीय कर्णधाराने तीच चूक पुन्हा केली तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, कारण अक्षर पटेलने अहमदाबादच्या मैदानावर 2 सामन्यांत 20 बळी घेतले आहेत.

टीम इंडिया गेली 15 वर्षे अजिंक्य

टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त दोनच कसोटी सामने गमावले आहेत. त्याचवेळी, गेल्या 15 वर्षांत अहमदाबादच्या मैदानावर कोणताही प्रतिस्पर्धी संघ भारताला पराभूत करू शकलेला नाही.

Back to top button